
मुंबई: आज मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. यादरम्यान जय जवान आणि कोकणनगर दहीहंडी पथकाने दहा थर लावत विश्वविक्रम केला. इतकेच नव्हे तर इतर प्रतिष्ठित दही हंडी पथकांनी देखील विशेष कामगिरी करत दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचा उत्साह कायम ठेवला. यादरम्यान अनेकांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला. संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली आणि भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला दाखवून देणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर' ची दखल देखील यादरम्यान घेतली गेली. घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर आयोजित राम कदम यांनी आयोजित केलेली दहीहंडी ही ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याल सलाम करण्यासाठी उभारण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित सैन्य दलातील जवानांना भेटून संवाद साधला. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आ. राम कदम यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शहर व उपनगरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान त्यांनी घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील दहीहंडी उत्सवाला देखील हजेरी लावली होती, यादरम्यान त्यांनी "ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचीती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार काढले.