
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २१० फेऱ्या धावतात. सीएसएमटी-कल्याण लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली या स्थानकांवर थांबते. उर्वरीत रेल्वे स्थानकांत फलाटांची लांबी पुरेशी नसल्यामुळे लोकलचा थांबा देण्यात आलेला नाही. सीएसएमटीतील केवळ फलाट क्रमांक सातची लांबी १५ डबा लोकल फेऱ्या चालवण्यासाठी योग्य आहे. यामुळे फलाट क्रमांक पाच आणि सहाची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर लोकल गाडी उभी करण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या फेऱ्या पूर्ण झाल्यावर सीएसएमटी आणि कल्याण यार्ड अशा दोनच ठिकाणी लोकल गाडी उभी करण्याचा पर्याय आहे.
धीम्या मार्गावर १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर दोन टप्प्यांत १५ डबा लोकल फेऱ्यांचा विस्तार प्रस्तावित आहे. पहिल्या टप्यात कर्जत मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांचा आणि दुसऱ्या टप्प्यात कसारा मार्गावरील रेल्वे स्थानकांतील फलाटांचा समावेश आहे. सीएसएमटी ते ठाणेदरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वे स्थानकात फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागेची मोठी अडचण आहे. यामुळे सीएसएमटी ते ठाणे जलद आणि ठाण्याच्या पुढे धीमी अशा अर्धजलद लोकलचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकूर्ली रेल्वे स्थानकातील प्रवाशांनाही १५ डबा लोकलमधून प्रवास करणे शक्य होणार आहे.