अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह जीवन संपवलं आहे. अरुण काळे ( वय ३० वर्ष ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून, अरुण काळे यांनी आधी आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून मग स्वत: आमहत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोहाळे शिवरात घडली आहे. लहान चिमुकल्या लेकरांसह अशाप्रकारे आत्महत्या केल्यामुळे सदर परिसरात खळबळ उडाली आहे.
अरुण काळे हे चिखली कोरेगाव , तालुका श्रीगोंदा येथील निवासी होते. बायकोसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी आपली एक मुलगी शिवानी अरुण काळे ( वय ८ ) आणि आणि प्रेम अरुण काळे ( वय ७ ) वीर अरुण काळे ( वय ६ ) , कबीर अरुण काळे ( वय ५ ) या तीन मुलांसह आत्महत्या केली आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर एक पाय आणि एक हात दोरीने बांधलेल्या अवस्थेमध्ये अरुण काळे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे.
दरम्यान विहिरीपासून काही अंतरावर काळे यांची मोटर सायकल आढळली आहे. श्रीगोंदा येथून अरुण काळे हे आपल्या चार मुलांसह मोटारसायकलवर राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारात आले होते, को-हाळे शिवारात शिर्डी – नगर बायपासच्या कडेला मोटरसायकल लावून ते विहिरीपर्यंत गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अरुण काळे यांचा आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीशी वाद झाला होता, या वादामुळे त्यांची पत्नी आठ दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी येवला येथे गेली होती. मात्र बायको घरी येत नसल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचल्याची माहिती समोर येत आहे, आधी त्यांनी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकललं आणि नंतर त्यांनी विहिरीत उडी घेतली असावी असा अंदाज आहे.