
आसावरी जोशी : मनभावन
धी तू भरगच्च फुलांनी सजलेला. अगदी नखशिखांत. लालस फुलांच्या लालीने तू अधिकच निरागस दिसू लागतोस. पाना- फुलांत पशु-पक्ष्यांत मन:पूर्वक रममाण तू. हे निसर्गातले तुझे सवंगडी. तुझी बासरी आणि तुझे प्रतिरूप राधा… एवढेच पुरेसे असते न तुला अत्यंत आनंदी राहायला. तो तुझा निखळ आनंद अगदी सहज पाझरू लागतो तुझ्या वेणूतून आणि हे सप्तसूर आभाळभर पसरतात तलम मायेगत आणि ही तुझी माया साऱ्या चराचराला सामावून घेते.
तुझ्या प्रसन्न निळाईत, ही निळाई अवघे विश्व व्यापून उरते. ठायी ठायी फक्त तू असतोस. तिन्ही लोक व्यापून, मनभरून सामावलेला आमच्या मनात… तू प्रत्येकाच्याच मनात सामावला आहेस. फक्त गोकुळ, वृंदावन, मथुरा, गोप-गोपी, राधा, रुक्मिणी, द्रौपदी, पार्थ या जगात तू जरी रममाण असलास तरी, तुझ्या असीम निळाईची पावले आमच्याही हृदयावर कोरली गेली आहेत. हवीहवीशी वाटणारी ही तुझी पावले अगदी न कळत्या वयापासून आमच्यासोबत असतात.
अगदी प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात! तुझी माझी ओळख तर मला थेट गोव्याला घेऊन जाणारी. माशेलचे देवकी कृष्णाचे मंदिर, माझ्या आजीच्या वडिलोपार्जित वाड्यासमोर असलेले. प्रत्यक्ष पाहिले नाही मी ते अजून, पण आजीकडून ऐकलेल्या गोष्टीत आहेस. तशीच मूर्ती आमच्या देवघरातही आहे. देखणी, प्रेमळ, तृप्त, अतीव माया सांडणारी देवकीआई तुला पुढ्यात घेऊन बसली आहे.
मोठ्ठ्या मोठ्ठ्या डोळ्यांचा तू आपले भरजरी झबले मिरवीत मिश्किलपणे साऱ्यांना निरखतो आहेस. इतका चिमुकला तू, पण तुझे असे निरखून पाहणे किती आश्वासक वाटायचे तेव्हाही आणि अजूनही वाटते. लंगडा बाळकृष्ण… समस्त आई, आज्यांचं लाडकं बाळ. घरात गोड काही शिजले. आधी घासभर नैवेद्य लंगड्या बाळकृष्णाला. किती लोभस असते तुझे छोटेसे अस्तित्व सुबक देवघरात. तुझे असणे एवढ्यावरच थांबलेले नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते बदलत जाते. खरे पाहता तू तसा अलिप्तच. बाप्पासारखा ऐसपैस तर नाहीच नाही.
अगदी सोपा असूनही गूढसा. तू योगेश्वर... तू युगंधर...
नाहं वसामि वैकुंठे.. योगिनां हृदये रवो..
मदभक्ता यत्र गायन्ति.. तत्र तिष्ठा मिनारदा||
एकदा नारदमुनीनी श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, देवा तुम्ही सगळ्यात कुठे आनंदी असता? कुठे राहायला तुम्हाला जास्त आवडते? यावर दोन ओळींच्या श्लोकात तू स्वत:भवतीची गूढता अगदी सोपी करून टाकलीस. ना तू वैकुंठात रमतोस, ना ऋषीमुनींच्या सानिध्यात. पण जेथे तुझ्यावर निखळ, निरपेक्ष प्रेम करणारे भक्त असतात, त्या भक्तांमध्ये, त्यांच्या सुख-दु:खात, त्यांच्या जगण्यात, छोट्या छोट्या आनंदात, अवघड प्रसंगात त्यांना मदत करण्यात मी रमतो. अगदी मनापासून… मी त्यांच्या हृदयात असतो कायमचा. फक्त त्यांना ते ओळखता आले पाहिजे.
खरेच तू आमच्या हृदयात असतोस. पथदर्शक म्हणून, सखा म्हणून, सारथी म्हणून, साथ तर देतोसच. पण चुकीच्या प्रसंगी अगदी कानही उपटतोस. फक्त तुझ्या प्रत्येक कृतीचा अर्थ आम्हीच ध्यानात घायला हवा. तुला काय सुचवायचे आहे हेही लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी आम्हीच आमचे कान, डोळे आणि मन उघडे ठेवायला हवे.
तुझे सावळेपण, निळाई मनास सुखावणारी, मोहवणारी, तू कधी बासरीच्या सुरांत हरवतोस, पण आमचा हट्ट पुरविण्यासाठी गेली असंख्य युगे एका विटेवर उभा आहेस. रखुमाईचा रोष पत्करून आणि तुझ्या प्रेमाखातर तुझ्या भक्तांसाठी तीही उभी आहे. तुझ्यासारखीच एका विटेवर.
असंख्य रूपे तुझी… कधी मर्यादापुरुषोत्तम, कधी सावळे, परब्रम्ह विठ्ठलपंत, तापट परशुराम, उग्र, आवेशयुक्त नरसिंह. निसर्गावर, प्राणीमात्रांवर तर तुझी विशेष माया. म्हणूनच तू मत्स्य, तू कूर्म, तू वराह, साऱ्यांना जवळ केलेस तू आणि अवघे विश्व देखणे बनवलेस स्वत:सारखे. पण अजूनही माणसातील निकस काढू शकलेला नाहीस. किंबहुना तू ते त्याच्या कर्मावरच सोडले आहेस. कर्मयोग शिकवताना.. म्हणूनच अर्जुनाला सांगितलेस.. मी कोणाचे प्रारब्ध लिहित नाही किंवा बदलूही शकत नाही.
माणसाची भल्या-बुऱ्या कर्मातून त्याचे प्रारब्ध घडत जाते.
तुझी एक गोष्ट कायम आठवत राहते. एकदा तू तुझ्या आवडत्या भक्ताच्या स्वप्नात आलास आणि त्याच्याशी गप्पा मारत त्याच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा दाखविण्यास सुरुवात केलीस. खूपच लाडका भक्त होता तो तुझा, हे तू त्याच्याबरोबर प्रत्येक प्रसंगात चालणाऱ्या तुझ्या सुकुमार पावलांवरून दाखवून देत होतास. पण काही ठिकाणी मात्र त्याला एकच पावलांची जोडी उमटलेली दिसली. भक्त म्हणाला, देवा या बऱ्याच ठिकाणी एकच पावलांची जोडी आहे आणि तो माझ्या आयुष्यातील फार कठीण कालखंड होता. त्यात तुही इतरांप्रमाणे माझी साथ सोडलीस.
त्यावर तू हलकेच हसलास, म्हणालास, जिथे जिथे एकच पावलांची जोडी दिसते आहे ना… ती माझी पावले आहेत. त्यावेळी तुला मी उचलून घेतले होते. प्रारब्ध बदलू शकत नाहीस तू कोणाचेच, पण अंत:करणातील साद ऐकून मदतीला मात्र धावून येतोस. सत्वर... मग ती तुझी प्रिय पांचाली, कृष्णा असो, तुझी प्राणप्रिया तुलसी असो, गजेन्द्रासारखा गजराज असो. अगदी स्वत:चेही प्रारब्ध तू बदलू शकलेला नाहीसच, म्हणूनच तुझेच प्रतिरूप राधा तुला भेटली आयुष्याच्या संध्याकाळी गहिऱ्या, अथांग समुद्रावर आणि तिच्यासाठी तुझे प्रेम उमटत होते. गूढ बासरीच्या सुरांतून...