Saturday, August 16, 2025

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी पुण्यात निधन झाले आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  पण आज, त्यांनी वयाच्या ६९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


ज्योती चांदेकर यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ज्योती यांनी गुरु, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊलवाटा, सलाम, सांजपर्व अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. तसेच मराठीच्या छोट्या पडद्यावर देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांची पूर्णा आजी ही भूमिका विशेष गाजली होती.



'मी सिंधुताई सपकाळ' सिनेमातील काम अजरामर 


ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकीने मी सिंधुताई सपकाळ या  चित्रपटात एकत्र काम केलं.  तो चित्रपट मराठीतील अजरामर चित्रपटांपैकी एक ठरला. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात त्या दोघींनी सिंधुताईंच्या आयुष्यातील दोन विविध पर्वातील भूमिका साकारल्या. या दोघींचं त्यांच्या भूमिकांसाठी खूप कौतुक झालं होतं. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. ज्योती चांदेकर यांना मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.


ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ज्योती चांदेकर यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >