Friday, August 15, 2025

पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे

पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे
नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ काळ भाषण देण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी १०० मिनिटांहून अधिक काळ भाषण दिले आहे. याआधी त्यांचे सर्वात दीर्घ भाषण ९८ मिनिटांचे होते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लाल किल्ल्यावरून हे सर्वात मोठे भाषण दिले होते, आणि यंदा त्या विक्रमालाही मागे टाकले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजेच २०१५ मध्येच, लाल किल्ल्यावरून सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रम मोडला होता. त्या वेळी त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले होते आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ७२ मिनिटांच्या भाषणाचे जुने रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा स्वतःचे विक्रम मोडले आणि आता १०१ मिनिटांहून अधिक काळ भाषण देऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांनी लाल किल्ल्यावर सलग १२व्यांदा तिरंगा फडविला आहे. यापूर्वी हे फक्त जवाहरलाल नेहरू यांनीच केले होते. त्यांच्या नंतर इंदिरा गांधी यांच्या नावे सलग ११ वेळा तिरंगा फडविण्याचा विक्रम होता, जो यंदा पंतप्रधान मोदी यांनी मोडला आहे.
Comments
Add Comment