
निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी
मुंबई : दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबईतील भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी आता मुंबईकर करीत आहे. मागील १५ वर्षांत १२ लाख ७३ हजार तर २०२४ मध्ये १ लाख ३५ हजार २५३ मुंबईकरांना भटक्या श्वानांनी चावा घेतला. त्यामुळे भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करून त्यांनाही आश्रयस्थानात हलवण्याची मागणी होत आहे.
२०१४ च्या गणनेनुसार मुंबईत ९५ हजार १७४ भटके श्वान होते. त्यामुळे गेल्या अकरा वर्षात मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या लाखांत गेली आहे. मुंबईत गेल्या २२ वर्षांत १६ लाख ६० हजार भटक्या श्वानांचा प्रश्न कायम असून, त्यावर अद्याप प्रभावी नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. दरवर्षी मुंबई महानगरपालिका या भटक्या श्वानांची नसबंदी करत असते. मात्र दर पावसाळ्यात हा प्रश्न ऐरणीवर येतो.
भटक्या कुत्र्यांकडून बालके, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांच्यावर पाठलाग करत हल्ल्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. भटक्या कुत्र्यांची समस्या नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच पालिकेने उपाय करण्याची मागणी होत आहे. मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना आमदार अमित साटम यांनी पत्र पाठवले असून मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी करून त्यांच्यासाठी आश्रयस्थाने तयार करुन तेथे स्थलांतरीत करावे, अशी मागणी केली. यामुळे कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना कमी होतील होईल,असा दावाही त्यांनी केला.