Friday, August 15, 2025

“न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही”- पंतप्रधान

“न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही”- पंतप्रधान

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ठाम भूमिका


नवी दिल्ली : देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण करत स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला. "न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग आजवर खूप सहन केले, पण आता अजिबात सहन करणार नाही," असे ठाम वक्तव्य करत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारची कठोर भूमिका अधोरेखित केली.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दहशतवाद पसरवणारे आणि त्यांना साथ देणाऱ्यांना आता एकाच नजरेनं पाहिलं जाईल. आपल्या सैन्य दलांना त्यांच्या विरोधात कारवाईसाठी पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे.” त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे उदाहरण देत भारतीय सैन्याच्या कार्यक्षमतेचे जोरदार कौतुक केले. “शत्रूंना त्यांच्या कल्पनेपेक्षाही कठोर शासन आपल्या जवानांनी केलं आहे,” असे ते म्हणाले.



संविधान, स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रीय एकता यांचे स्मरण


स्वातंत्र्य दिनाचं हे पर्व १४० कोटी भारतीयांचे गौरवपर्व असल्याचं सांगताना पंतप्रधान म्हणाले, “प्रत्येकाच्या मनात आशा-अपेक्षा आहेत आणि देश एकतेच्या दिशेने मजबूतपणे वाटचाल करत आहे.” त्यांनी 1947 मधील स्वातंत्र्यप्राप्तीच्या आठवणींना उजाळा दिला आणि संविधान निर्मिती प्रक्रियेत योगदान देणाऱ्या महापुरुषांना आदरांजली अर्पण केली.


“आपल्या संविधानाने 75 वर्षे देशाला मार्गदर्शन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार पटेल, आणि इतर अनेक थोर पुरुष-स्त्रियांनी देशाला दिशा दिली,” असं सांगत त्यांनी नारीशक्तीचंही विशेष गौरव केला



श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत ‘एक देश, एक संविधान’


आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती असल्याचं सांगत पंतप्रधान म्हणाले, “कलम ३७० हटवून ‘एक देश, एक संविधान’ हे स्वप्न आम्ही पूर्ण केलं आणि मुखर्जींना खरी आदरांजली अर्पण केली.”



भारत एक आशावादी राष्ट्र”


देशभरातील विविध क्षेत्रातील लोकांची उपस्थिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्रम पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांबद्दल बोलताना मोदी म्हणाले, “आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा, आणि प्रत्येक नागरीक देशाच्या प्रगतीसाठी योगदान देत आहे.” असे मोदी यांनीयावेळी सांगितले.


Comments
Add Comment