चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी ते पडले होते, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि अखेर त्यांचे निधन झाले.
ला. गणेशन यांची १२ फेब्रुवारी २०२३ रोजी नागालँडचे २१ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी पदभार स्वीकारला होता. यापूर्वी त्यांनी मणिपूर आणि पश्चिम बंगालचेही राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. ते भाजपचे एक ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.