Friday, August 15, 2025

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला

नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार असल्याची चर्चा आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र त्यापूर्वीच नांदेड दौऱ्यावर असताना जरांगे यांची प्रकृती अचानक बिघडली. दौऱ्यादरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्याची बातमी समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचाच एक भाग म्हणून ते आज शुक्रवारी (दि. १५) नांदेडमध्ये  होते. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली. शुक्रवारी सकाळपासूनच नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांसोबत सलग बैठकांचं आयोजन केलं होतं. मागील काही दिवसांपासून त्यांच्या दौऱ्यांची व्याप्ती, सततचा प्रवास, भाषणं आणि बैठकींचा ओघ थांबलेला नाही. याच थकव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावल्याचे बोलले जात आहे. डॉक्टरांकडून सध्या त्यांच्या प्रकृतीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

जरांगे पाटील यांचा एल्गार

मनोज जरांगे पाटील यांनी लातूर दौऱ्यावर असताना कुणीही आडवं आलं तरी आम्ही मुंबईला जाणार असा एल्गार केला होता. काल गुरुवारी लातूरमध्ये असताना ते म्हणाले की, "आम्हाला आरक्षण दिलं तर सरकारचं गुलाल लावून आभार मानणार आहोत. कुणीही आडवं आलं तरी आम्ही मुंबईला जाणारच आहोत. माझा जीव गेला तरीही मी मुंबईत जाणारच आहे. आझाद मैदानात बसून आरक्षणाची लढाई लढणार आहे."

Comments
Add Comment