Friday, August 15, 2025

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी बसचा भीषण अपघात झाला आहे. वृत्तानुसार, बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी होते आणि गंगा नदीत पवित्र स्नान करून परतत होते. दुर्गापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे वर्धमानहून दुर्गापूरला जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग १९ वरील नाला फेरी घाट येथे ही टक्कर झाली. मृतांमध्ये आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात सहा मुले जखमी झाली आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली.

हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना बर्दवान मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगानं जात होती. दरम्यान, चालकाला पार्क केलेला ट्रॅक्टर दिसला नव्हता. त्यामुळे बस ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोरात आदळली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment