
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरड कोसळून रस्त्याचा मोठा भाग माती आणि दगडांखाली गेल्याने रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद झाला आहे .
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार , सकाळपासूनच डोंगराळ भागातून माती आणि लहान दगड सैल होऊन खाली पडत होते. त्यानंतर दरडीचा मोठा भाग खाली पडला आणि रस्त्याचा एक भाग यामुळे बंद झाला . या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही , पण दरड कोसळल्याने काही वाहने या ठिकाणी अडकून पडली आहेत .
या घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग घटनास्थळी पोहचले असून जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्त्यावरील माती व दगड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळण्याचा धोका अजूनही कायम असल्याने बचाव पथके याला ठिकाणी तैनात आहेत तसेच वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे . या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली असून, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
डोंगराला भागात सतत होणाऱ्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वीही पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत . ज्यामुळे अनेकवेळा मोठे अपघात देखील घडले आहेत. या घटना रोखण्यासाठी घाट परिसरात संरक्षक जाळी बसवण्याचे आवाहन स्थानिंकाकडून प्रशासनाला करण्यात आले आहे .
डोंगर कड्यांवर संरक्षक जाळी बसवणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी विशेष ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, तसेच पावसाळ्यात घाट परिसरात बचाव पथके तैनात करणे अशा विविध मागण्या होत आहेत . दरड कोसळलेला भाग रस्त्यावरून लवकरच काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल . प्रशासनाकडून पर्यटक आणि वाहनचालकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.