Thursday, August 14, 2025

सततच्या पावसामुळे पपनसावर किडीचा प्रादुर्भाव

सततच्या पावसामुळे पपनसावर किडीचा प्रादुर्भाव

गळ कीड रोगावर संशोधनाची मागणी


नांदगाव मुरुड : सतत बरसत राहणाऱ्या पावसामुळे कोकणातील पपनस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पपनसाच्या पिकाला पावसामुळे लागणाऱ्या गळ रोगांवर तसेच त्यावर पडणाऱ्या कीड रोगावर संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत येथील बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.


पपनस हे फळ रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन या तालुक्यातील विशेषतः समुद्र किनारी भागात श्रावण महिन्यापासून तयार होणारे नारळ-सुपारीच्या भागांतील एक प्रमुख आंतरपीक आहे. या पिकांच्या उत्पादनामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात येथील बागायतदारांना चार पैसे हमखास मिळतात. मुरुड तालुक्यासह ठाणे, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातील ग्राहकांचीही या फळांना मोठी मागणी असते.
विशेषतः कोकणातील गौरीच्या ओवशांच्या सुपामध्ये पपनसाच्या फळांना मोठे स्थान मिळते. गणपतीच्या मखराचीही पपनसाची पिवळी हिरवी फळे शोभा वाढवितात. ऐन पावसाळी हंगामात ही फळे तयार होत असल्याने अशा दमट वातावरणात तयार फळांना कीड लागते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे तयार फळांना गळ लागते. आळ्यांनी पोखरल्याने फळे नासण्याची शक्यता जास्त असते. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे साहजिकच पपनस फळांची गळ वाढली आहे.


गणेशोत्सवाला आता दहाबाराच दिवस राहिले असून तयार पपनस फळांचा सडा बागायतीत पडलेला दिसून येत असल्याने यावर्षी येथील बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कृषी विभागानेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment