
रात्री-अपरात्री घरी परतणे आता दिवसेंदिवस धोक्याचे बनत चालले आहे. ही भीती चोरट्यांची, लुटमार करणाऱ्यांची अथवा नशाबाज करणाऱ्यांची नसून भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाची आहे. भटक्या कुत्र्यांकडून एकवेळ भुकंणे समजू शकते; परंतु अलीकडे या कुत्र्यांच्या झुंडीमुळे अनेकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. ही समस्या कोणा भागापुरती मर्यादित राहिलेली नाही. यामुळे स्वत: सर्वोच्च न्यायालयाला भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर स्वत:हून याचिका दाखल करून घ्यावी लागली. समस्येचे गांभीर्य त्यातूनच दिसून येतेे. आपल्या देशात श्वानप्रेमींची संख्या लक्षणीय आहे. या श्वानप्रेमींना ही कुत्री स्वत:च्या घरात सांभाळायची नाहीत, तर रस्त्यावर, चौकाचौकांत असणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खाद्य घालायचे आहे. एकीकडे श्वानांकडून होत असलेल्या उपद्रवाची जबाबदारी स्वीकारायची नाही आणि दुसरीकडे श्वानांविरोधात कारवाई केल्यास त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने करायची, न्यायालयाचे दरवाजे ठोठावयाचे अशा घटना श्वानप्रेमींकडून वाढू लागल्यात. रात्रीच्या वेळी उच्चभ्रू मंडळी आपल्या वाहनातून खाद्य घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा शोध घेतात. राजधानी दिल्लीमध्ये सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल २६ हजारांहून अधिक जणांना मोकाट कुत्र्यांनी चावे घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला या समस्येची दखल घ्यावी लागली. दिल्लीमध्ये चावा घेण्याच्या संख्येत वाढ होत असली तरी यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान ६५ हजारांपेक्षा अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण झाले आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये रात्रीच्या वेळी कचरा संकलन करणाऱ्या, कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांना, धुरीकरण करणाऱ्यांना, मूषक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व रात्रीच्या वेळी जे नागरी समस्या निवारणाचे व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करतात, त्यांना महिन्यातून अनेकदा कुत्र्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागते. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी कुत्रा चावण्याच्या ३७ लाखांहून अधिक घटना घडत; ३०५ लोक रेबीजमुळे मरण पावतात. केवळ निर्बीजीकरण पुरेसे नाही, मानवी जीवितांचे संरक्षण करणे आता आवश्यक झाले आहे. ३७ लाख हा आकडा कागदोपत्री असला, तरी प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत असणाऱ्या कचराकुंड्या भटक्या कुत्र्यांचे माहेरघर बनले आहे. कचराकुंड्यांमध्ये सहजासहजी खाद्य उपलब्ध होत असल्याने भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी कचराकुंड्याभोवती दिसून येतात. घरात पाळल्या जाणाऱ्या कुत्र्यांची प्रशासन दरबारी नोंद करण्यास तसेच प्रशासनाकडे शुल्क भरणा करण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात असते. अनेकदा काही घटकांकडून लहानपणापासून घरामध्ये कुत्री पाळायची, पुढे तीच कुत्री रस्त्यावर सोडून दिली जातात.
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबईतील भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी आता मुंबईकर नागरिकांकडून सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उरण, नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथ, वसई-विरार भागातही मोकाट कुत्र्यांकडून चावे घेण्याचे, हल्ले करण्याची समस्या गंभीर झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी श्वानाची धरपकड करण्याची मोहीम गल्लोगल्ली राबविली जात असते, त्यावेळी हे श्वानप्रेमी मोकाट कुत्र्यांना गच्चीवर तसेच सोसायटींच्या आवारात लपवून ठेवत असतात. गेल्या पंधरा वर्षांत १२ लाख ७३ हजार तर २०२४ मध्ये १ लाख ३५ हजार २५३ मुंबईकरांना भटक्या श्वानांनी चावा घेतला आहे. त्यामुळे, भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करून त्यांनाही आश्रयस्थानात हलवण्याची मागणी होत आहे. २०१४ च्या गणनेनुसार मुंबईत ९५ हजार १७४ भटके श्वान होते. गेल्या अकरा वर्षांत मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या काही लाखांत गेली आहे. मुंबईत गेल्या २२ वर्षांत १६ लाख ६० हजार भटक्या श्वानांचा प्रश्न कायम आहे. दरवर्षी मुंबई महापालिका या भटक्या श्वानांची निर्बीजीकरण करत असते. मात्र, दर पावसाळ्यात हा प्रश्न ऐरणीवर येतो. भटक्या कुत्र्यांची समस्या नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच पालिकेने उपाय करण्याची मागणी होत आहे. मुंबईतील अनेक आमदारांनीही मतदारसंघातीलच नाही तर शहर व उपनगरातील भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडे टाहो फोडला आहे. मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे काही आमदारांनी मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी करून, त्यांच्यासाठी आश्रयस्थाने तयार करून तेथे स्थलांतरीत करावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना कमी होतील आणि सार्वजनिक सुरक्षेची वाढती चिंता कमी होण्यास मदत होईल, असा दावाही केला आहे. २००९ ते २०२४ या कालावधीत भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी २४ कोटी ३ लाख २७ हजार रुपये खर्च करण्यात आले. भटक्या कुत्र्यांची समस्या मुंबईलगतच्या नवी मुंबई शहरातही आहे. तिथेही दिघा ते बेलापूरदरम्यान भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. यावर्षी जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत शहरात सात महिन्यांत ६ हजार ९३९ जणांना त्यांनी चावा घेतला. दिघा, ऐरोली व घणसोली तसेच एमआयडीसी परिसरात व गावठाण विभागात दहशत अधिक आहे. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी दिसतात. रात्री उशिरा घरी येणाऱ्यांच्या मनात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. महापालिकेकडून श्वानांच्या निर्बीजीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या गंभीर झाल्याचा आरोपही होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असली, तरी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला नागरिकांकडून सहकार्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे.