Thursday, August 14, 2025

मराठवाड्यातील धरणात मुबलक पाणीसाठा

मराठवाड्यातील धरणात मुबलक पाणीसाठा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यांत यंदा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे मराठवाड्यात असलेल्या धरणांमध्ये सद्यस्थितीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत एकूण ४४ मोठे प्रकल्प आहेत. त्या सर्व मोठ्या प्रकल्पात सध्या ४४९५.३ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. मराठवाड्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पात सद्यस्थितीला ८०.६३ टक्के दलघमी पाणीसाठा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा पाणीसाठा दुपटीपेक्षा खूप अधिक असल्याची शासन दरबारी नोंद आहे.


पावसाळा सुरू झाल्यानंतर मराठवाड्यासाठी ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती आहे. एकीकडे नाशिक भागात झालेल्या चांगल्या पावसामुळे जुलै महिन्यातच जायकवाडी धरण ७३ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असताना इतर प्रकल्प मात्र अद्याप निम्म्याहून कमी, तर काही प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचे प्रमाण अवघे ५० टक्के इतके असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. लावलेल्या पिकांना पाणी कमी पडल्याने काही प्रमाणात कीड लागलेली असल्याने दुबार पेरणीचे संकट अनेकांवर ओढवले आहे. राज्यात अभितांश ठिकाणी वरुणराजा प्रसन्न झाला असला तरी मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाहीये. मराठवाड्यात सरासरीपेक्षा फक्त ५० टक्के एवढाच पाऊस झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर परिस्थिती अजून बिकट असून, पावसाळा अर्धा संपला तरी मोठा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. रिमझिम पावसामध्ये पेरण्या केलेल्या पिकांची वाढ खुंटलेली दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस असल्याने पिकांवर रोग मोठ्या प्रमाणावर पसरलेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा किंवा दुबार पेरणीचा खर्च वाढलाय. शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेने आता आभाळाकडे पाहू लागला आहे.


मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत एकूण ८१ मध्यम प्रकल्प आहेत. त्यामध्ये सद्यस्थितीला १०५६.४२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे, तर वापरण्यायोग्य पाण्याची स्थिती देखील चांगलीच म्हणजे ४२.१८% दलघमी पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजी नगर विभागअंतर्गत मराठवाड्यात ७९५ लघू प्रकल्प आहेत त्यामध्ये देखील मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तम पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी अशा प्रकल्पात केवळ अठरा टक्के पाणीसाठा होता, तर यंदा हाच पाणीसाठा २९.७८% एवढा आहे. महाराष्ट्रात असलेल्या नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे व कोकण या विभागाअंतर्गत असलेल्या धरणांपैकी सर्वाधिक धरणे छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागअंतर्गत लहान, मोठे व मध्यम असे एकूण ९२० धरण आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपेगाव उच्चस्तरीय बंधारा तसेच पैठण येथे असलेल्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. जायकवाडीचे धरण सद्यस्थितीला ९१.८८% भरले आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या बोरगाव, अंजनपूर, धनेगाव उच्चस्तरीय बंधारा, डोंगरगाव उच्चस्तरीय बंधारा, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी तसेच शिरस व वांगदरी धरणात चांगली स्थिती आहे. बीड जिल्ह्यात देखील मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने त्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी बीड जिल्ह्यात असलेल्या माजलगाव धरणात १४ ऑगस्ट रोजी शून्य टक्के पाणीसाठा होता; परंतु आजच्या तारखेत त्या ठिकाणी ३१.७०% पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच मागच्या वर्षी सिरस मार्ग येथील निम्नस्तरीय बंधाऱ्यांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा होता; परंतु यंदा तोच पाणीसाठा ४७.५७% एवढा आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील धरणदेखील यंदा चांगले भरलेले आहेत.


मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर व येलदरी असे दोन प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातही चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे. सिद्धेश्वर धरणात ८१.६३% तर येलदरी धरणात ९२.८४% पाणीसाठा उपलब्ध आहे. नांदेड जिल्ह्यात असलेल्या आमदुरा, ढालेगाव, दिगडी, दिग्रस, हिरडपुरी, जोगलादेवी, किनवट, लोणी, सांगवी, निम्नमनार, मंगरूळ, मुदगड, राजाटाकळी व विष्णुपुरी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. नांदेड शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात ८६.५३% एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा शहराला भर उन्हाळ्यात देखील पाणी पुरवेल एवढा साठा शिल्लक असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच धाराशिव जिल्ह्यातील औराद, गुंजाळगा, किल्लारी, लिंबाळा, निम्न तेरणा, मदनसुरी, राजेगाव, सीना व तागरखेडा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. लातूर जिल्ह्यात असलेल्या भुसाणी, बीडगिहाळ कारसा पोहरेगाव, खुलगापूर, नागझरी, साई, शिवनी, टाकळगाव देवळा व वांजरखेडा उच्चस्तरीय बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. एकेकाळी लातूर जिल्ह्यात रेल्वेने पाणी आणावे लागले होते, परंतु यंदाच्या वर्षी लातूर जिल्ह्यातील सर्वच लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. परभणी जिल्ह्यात असलेल्या निम्न दुधना प्रकल्पात यंदा चांगलाच पाणीसाठा आहे. या प्रकल्पात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूप अधिक प्रमाणात पाणीसाठा आहे.


१४ ऑगस्ट रोजी या धरणात ६३.५३% पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. समाधानकारक पावसामुळे शेतातील पिके देखील चांगलीच डोलत आहेत. मराठवाड्यात शेतात असलेल्या पिकांची परिस्थिती चांगली आहे. पुढच्या आठवड्यात पोळा हा सण असल्याने पावसाळ्यात देखील शेतकरीराजा पोळा सण साजरा करण्याच्या दृष्टीने तयारीला लागला आहे. दरवर्षी पोळ्याला देखील चांगलाच पाऊस पडतो. यंदादेखील गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने पोळा सण आनंदात साजरा होणार, असे निसर्गाचे संकेत आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील धरणांची स्थिती मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूप चांगली आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात मराठवाड्याला पाण्याची म्हणावी तेवढी चणचण भासणार नाही, अशी स्थिती सध्या तरी दिसून येत आहे.


- डॉ. अभयकुमार दांडगे

Comments
Add Comment