Wednesday, August 13, 2025

आरोग्य यंत्रणा सक्षम होणार का?

आरोग्य यंत्रणा सक्षम होणार का?

वार्तापत्र: उत्तर महाराष्ट्र 


नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे काही दिवसांपूर्वी बोगस डॉक्टरवर झालेली कारवाई ही धाक दाखविण्यासाठी होती का? इतर बोगस डॉक्टरांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे


नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरकारी वैद्यकीय क्षेत्र पुरते कोलमडले असल्याचे चित्र मागील काही घटनांवरून दिसून येत आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषध साठा आहे, तर डॉक्टर नाहीत, काही ठिकाणी डॉक्टर आहेत, तर औषध साठा नाही आणि दोन्ही असतील, तर संबंधित आरोग्य कर्मचारी परिचारिका, वॉर्डबॉयच बेपत्ता असतात. रात्रपाळीतील डॉक्टर अन् कर्मचारी तर, कधीतरी कामाच्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे अडलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना नाइलाजास्तव खासगी डॉक्टरांकडे जाऊन महागडा औषधोपचार, तसेच शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारीदेखील विशाखा समितीच्या चौकशीत अडकले होते. तत्कालीन सीईओ अशीमा मित्तल यांनी जाताना त्यांना क्लीनचिट दिली असली तरी, काही संघटनांकडून त्यांच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.


नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर हरसूल, इगतपुरी ही तालुके आदिवासीबहुल आहेत. या तालुक्यांमधील अनेक गावांत रस्ते, वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे त्याचा आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. अनेक महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात येण्यासाठी रस्ते नसतात. रुग्णालयात आल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आणि अत्यावश्यक अशी मशीनरी देखील नसते. अनेक महिलांची प्रसूती ही रस्त्यात किंवा घरी देखील झाली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी देखील ग्रामीण भागात दौरे करत आहे, परंतु त्याचा अद्याप काही उपयोग झाला नसल्याचे समोर आले आहे.


नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे काही दिवसांपूर्वी बोगस डॉक्टरवर झालेली कारवाई ही धाक दाखविण्यासाठी होती का? इतर बोगस डॉक्टरांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात यापूर्वी ग्रामीण भागात अनेक बोगस डॉक्टर सापडले आहेत; परंतु या डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य सेवा दिली जाते. काही दिवसांपूर्वीच श्री कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने दुर्गम भागातून केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करता हुसकावून दिले होते. या प्रकरणी जिल्हा परिषदेने चौकशी करत या डॉक्टरांच्या विरोधातील अहवाल राज्य शासनाकडे पाठवला आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरची विभागीय स्तरावरून चौकशीदेखील झाली; परंतु पुढे काहीच झाले नाही.


जिल्ह्यात काही महिन्यांत अंजनेरी (त्र्यंबकेश्वर), चिंचओहोळ (मालेगाव), चांदोरी (निफाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या; परंतु त्याबाबत कारवाई गुलदस्त्यातच आहे. कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री अकराच्या सुमारास कल्पना भोये (रा. खडकी, ता. कळवण) प्रसूतीसाठी गेल्या होत्या. मात्र, तिला रुग्णालयात दाखल करून न घेता डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. महिलेचे वडील काकाजी बागूल व नातेवाइकांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या डॉक्टरने त्यांच्यासोबत असलेल्या बीडच्या मित्राने त्या महिलेला व नातेवाइकांना अक्षरशः हुसकावून लावले. त्यानंतर या कुटुंबाने तत्काळ डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्या महिलेची प्रसूती झाली. दुसऱ्या दिवशीही डॉक्टर मद्यधुंद स्थितीत असल्याचे संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी सांगितले; परंतु पुढे काहीच होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चिंचओहोळ (मालेगाव), चांदोरी (निफाड)सह इतर काही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. अनेक वाईट अनुभव ग्रामस्थांना सातत्याने येत आहेत; परंतु प्रशासन याबाबत कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना बोगस डॉक्टरांच्या दवाखान्याची वाट धरावी लागत आहे. हे बोगस डॉक्टर जिल्ह्यातील अनेक भागांत कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत; परंतु दिखाऊ कारवाई काही उपयोगाची नाही.


ठोस अशा उपाययोजना करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी तत्कालीन सीईओ आशिमा मित्तल यानी अॅपदेखील कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु हे आश्वासनदेखील हवेत विरले आहे. आजही अनेक अधिकारी, कर्मचारी कामावर न जाता मुख्यालयी येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे जिल्हाभर दौरे खूप सुरू असतात; परंतु त्या दौऱ्यांचे फलित अद्याप दिसून येत नाही. आरोग्य अधिकाऱ्यांना विशाखा समितीकडून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टीवर मात करून आगामी काळात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करूया.



नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील प्रमुख घटक


जिल्हा रुग्णालय : नाशिक शहरात जिल्हा रुग्णालय आहे, जेथे गंभीर आजारांवर उपचार केले जातात.
उपजिल्हा रुग्णालये : प्रत्येक तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आहे, जेथे प्राथमिक आरोग्य सेवा पुरवल्या जातात.
प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) : ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, जिथे आवश्यक आरोग्य सेवा, लसीकरण, आणि माता-बाल संगोपन सेवा पुरवल्या जातात.
समुदाय आरोग्य केंद्रे (सी एच सी): काही ठिकाणी समुदाय आरोग्य केंद्रे आहेत, जी प्राथमिक आरोग्य केंद्रांपेक्षा अधिक चांगली आरोग्य सेवा पुरवतात.
आरोग्य उपकेंद्रे : गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रे आहेत, जिथे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य सेवा दिली जाते. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि
आयुष्यमान भारत योजना : या योजनांअंतर्गत, गरीब लोकांना मोफत आरोग्य सेवा आणि उपचारांचा लाभ मिळतो.
साथीचे रोग नियंत्रण : आरोग्य विभाग साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी काम करते.
आरोग्य शिक्षण : लोकांना आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्यासाठी आरोग्य शिक्षण कार्यक्रम राबवले जातात.
आरोग्य यंत्रणेची भूमिका : गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात सेवा, बालरोगतज्ञांच्या सेवा, आणि आवश्यक तपासण्या (एक्स-रे, रक्त चाचणी, सोनोग्राफी) मोफत पुरवल्या जातात. कर्करोग, क्षयरोग, मधुमेह इत्यादींसाठी निदान आणि उपचार सुविधा उपलब्ध आहेत. साथीचे रोग आणि आरोग्यविषयक समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. आरोग्य शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. स्वच्छता, पोषण आणि संसर्गजन्य रोगांबाबत जनजागृती केली जाते. कोरोना सारख्या महामारीच्या काळात, आरोग्य यंत्रणा सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करते.
- धनंजय बोडके

Comments
Add Comment