
जीवन संगीत: सद्गुरू वामनराव पै
जगातील बहुतेक सर्व धर्म हे परमेश्वराला मानणारे आहेत. परमेश्वराला मानणारे असूनसुद्धा ते एकमेकांशी भांडतात कारण खरा परमेश्वरच माहीत नसल्याने धर्माचा खरा अर्थही माहीत नसतो. जीवनाचे गणित का चुकते? जर गणित सोडवताना हातचा एक धरायला विसरलो तर सर्व गणित चुकते तसे परमेश्वराला विसरलो तर सर्व गणित चुकते तसेच परमेश्वराला विसरलो म्हणण्यापेक्षा परमेश्वराबद्दलचे अज्ञान असेल तर सगळे गणित चुकते. म्हणून परमेश्वराला मानणारे व न मानणारे सर्वच दुःखी आहेत. परमेश्वर ही कल्पना चुकली की धर्म ही संकल्पना चुकते. मात्र परमेश्वराबद्दलच्या अचूक ज्ञानाने धर्माची संकल्पना योग्य उमजते. परमेश्वर व धर्म याबद्दलचे अज्ञान याचा परिणाम हा संस्कृतीवर होत आहे. संस्कृती ही विकृती होते. आज हेच झालेले आहे. या तिन्ही गोष्टी बिघडल्या की माणसाचे विचार, उच्चार, आचार, इच्छा बिघडतात. जीवनविद्या सांगते की, तुम्ही जोपर्यंत परमेश्वराबद्दलचे ज्ञान समजून घेत नाही तोपर्यंत जगात सुख-शांती-समाधान नांदणार नाही. धर्माचा प्राण शांणपण हा आहे. Wisdom is the soul of religion. शहाणपणा वजा केला की उरते ते फक्त कर्मकांड. आज सर्व लोक केवळ कर्मकांड करण्यात मश्गूल आहेत. शहाणपण का नाही? परमेश्वराबद्दलचे अज्ञान. परमेश्वराबद्दलचे योग्य ज्ञान हे जीवनविद्येत येऊनच मिळते व त्यातूनच शहाणपण येते. “जेथूनि चराचर त्यासी भजे”. संपूर्ण जगात आज जे काही आहे ते जिथून निर्माण झालेले आहे, ते त्यालाच घेऊन निर्माण झालेले आहे. समुद्रावर लाटा उठतात. छोट्या मोठ्या लाटा असतात, मात्र ते इतर काही नसून समुद्राचे पाणीच असते. मग आपण त्याला लाटा का म्हणतो? त्याला आकार आलेला असतो म्हणून. शांत झाले की ती लाट नसून केवळ पाणी असते. तलाव शांत आहे. कुठलाही तरंग नाही. पण तुम्ही जर त्यात दगड टाकला तर तरंग उठतो. तसे मानवजातीचे झालेले आहे. तिथे शहाणपण नाही. ते आले की बदल व्हायला सुरुवात होते, मात्र ते नसेल तर परिस्थिती अधिकाधिक बिघडत जाते. कुटुंबात शहाणपण असेल तर थोडे तरी आनंदी राहता येते, सुखी होता येते. शहाणपण नसेल तर भांडणतंटे होतात. अगदी भरपूर संपत्ती असली, मात्र शहाणपण नसेल तर कुटुंबात त्या संपत्तीसाठी कोर्ट- कचेऱ्या, एकमेकांशी वैर अशा गोष्टी सुरू होतात. मनात एकमेकांबद्दल अनिष्ट विचार, भावना असतात. त्यातून अजून अनिष्ट गोष्टी घडतात. जशी जखम चिघळत जाते, तसेच हे सर्व देखील चिघळायला लागते आणि संबंधित सर्वांनाच त्याचा त्रास होतो. आता या सर्व गोष्टींवर उपाय एकच, तो म्हणजे परमेश्वराबद्दलचे योग्य ज्ञान व त्यातून येणारे शहाणपण. आज परिस्थिती अशी आहे की, परमेश्वर म्हणजे काय असे विचारले तर कोणाला नेमके उत्तर देता येणार नाही. अनेकजण आम्ही परमेश्वर मानत नाही, असे म्हणतात. मात्र परमेश्वर मानत नाही म्हणजे काय मानत नाही, हे मात्र त्यांना नीट सांगता येणार नाही. परमेश्वर या विषयाबद्दल जराही ज्ञान नसताना त्याला न मानणे किंवा त्याला मानणे म्हणजे नेमके काय? प्रत्यक्षात परमेश्वराला मानणारे व न मानणारे अशा दोन्ही बाजूंना परमेश्वराबद्दल प्रचंड अज्ञान असते.