Thursday, August 14, 2025

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. देशाला तोडणाऱ्या विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह देशाच्या अखंडतेला ध्यास धरावा असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.


दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतीय जनतेचा फाळणीचा संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. फाळणीच्या काळात भारतीयांनी भोगलेल्या यातना, विस्थापन आणि बलिदानांच्या स्मृतीचे स्मरण व्हावे आणि भावी पिढीत सामाजिक सलोख्याची भावना दृढ व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट २०२१ पासून हा दिवस पाळण्याची घोषणा केली होती.


राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देऊन रोजगार आणि उद्योगास आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आयटीआयमध्ये अनेक सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानसोबतच सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याचे भान असणे आवश्यक असल्याने मंत्री लोढा यांनी आयटीआयमध्ये दरमहा एक सामाजिक जबाबदारी वृद्धिगत करणारा कार्यक्रम आयोजित करावा असे निदेश दिले होते. याच श्रुंखलेतील एक भाग म्हणून ऑगस्ट महिन्यात विभाजन विभीषिका स्मरण दिवस पाळण्यात आला. त्यानुसार राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयच्या सुमारे एक हजार संस्थांमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. विविध संस्थांमध्ये फाळणी संदर्भात चित्र प्रदर्शन, व्याख्याने आणि नाटक सादर करून विद्यार्थ्यांना भारताच्या त्या काळ्या अध्यायाशी परिचित करण्यात आले. तसेच भावी पिढीत सामाजिक समरसता अबाधित राहून विघटनाच्या विचारापासून दूर राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >