
रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूण येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या राखी संकलन कार्यक्रमात राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी थेट आणि बिनधास्त शब्दांत प्रहार केला."राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात हिंदू समाजाचा सिंहाचा वाटा आहे. इतर धर्मियांकडून आम्हाला मतदान मिळालं नाही. मोहल्ल्यात फिरलात तरी त्यांचं मतदान झालं नाही. पण हिंदू समाजाने आम्हाला सत्तेत बसवलं. त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणं, त्यांचं रक्षण करणं ही आमची पहिली जबाबदारी आहे," असं स्पष्ट शब्दांत राणे म्हणाले. याचवेळी त्यांनी आजूबाजूला घडणाऱ्या लव्ह जिहादसारख्या घटनांचा उल्लेख करत, "अशा प्रसंगांकडे पाहिलं की, हिंदुत्ववादी सरकार का आवश्यक आहे, हे ठळकपणे जाणवतं" असा रोखठोक संदेश दिला.
राणेंनी विकासाच्या गप्पांवरही टोला लगावला, "विकास होत राहील, पण आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित ठेवण्यात आपण अपयशी ठरलो, तर त्या विकासाचा काय उपयोग?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या भाषणाने सभेत उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, पण राजकीय वर्तुळात मात्र या वक्तव्यावरून नव्या वादळाची चाहूल लागली आहे.
माता-भगिनींचं रक्षण हा केवळ वादा नाही, संकल्प
"राज्यात जिहादच्या नावाखाली आपल्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिलं जातं. अशा विकृत प्रवृत्तीला एकच उत्तर आहे हिंदू समाजाची एकजूट," असा थेट इशारा राणेंनी दिला. त्यांनी या पार्श्वभूमीवर सांगितलं की, "राखी संकलन हा केवळ एक कार्यक्रम नसून, हा आपल्या माता-भगिनींच्या संरक्षणाचा संकल्प आहे." राणेंनी अभिमानाने जाहीर केलं की, "आज आम्ही तब्बल १४ हजार राख्या जमा केल्या आहेत. या प्रत्येक राखी योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवू. आणि याचा परिणाम येत्या काळात नक्की दिसेल. हिंदुत्व अधिक भक्कम होईल, हे निश्चित." त्यांच्या या भाषणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की राणे आता केवळ विकासाच्या वचनांपुरते मर्यादित नाहीत, तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर रणभूमी सजवण्यास तयार आहेत.

मुंबई : कबुतरखान्यांमुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयानेही ...
आया-बहिणीकडे वाकडी नजर? जाग्यावरच उत्तर मिळेल
"लव्ह जिहादसारखी प्रकरणं आता गावागावात शिरली आहेत. रत्नागिरीही याला अपवाद नाही. आपल्या घरच्या आया-बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं, तर त्याला जागेवरच उत्तर मिळालं पाहिजे. हे केवळ पोलिसांचं नाही, तर प्रत्येक हिंदू पुरुषाचं कर्तव्य आहे," असं राणेंनी ठामपणे सांगितलं. ते पुढे म्हणाले, "याला एकच सक्षम उत्तर आहे – हिंदू एकत्र या, खांद्याला खांदा लावून उभे राहा. हा केवळ समाजरक्षणाचा नाही, तर आपल्या अस्तित्वाचा लढा आहे."राणेंच्या या शब्दांनी कार्यक्रमात उपस्थित गर्दीला स्पष्ट संदेश गेला – लव्ह जिहादला तोंड देण्यासाठी हिंदू समाज आता केवळ बोलणार नाही, तर रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देणार.
राज्यात भक्कम हिंदू सरकार
पुढे ते म्हणाले, "हिंदू धर्माच्या दृष्टीने आपलं काम पक्कं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते फक्त राजकारण नाही, तर बहिणींचं रक्षण आहे. गृहमंत्री असताना त्यांनी जी पावलं उचलली, त्यामुळे आज राज्यात कोणीही आमच्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत करत नाही. लव्ह जिहादसारख्या विकृतींना राज्यात जागा नाही ही भावना आज प्रत्येक बहिणीच्या मनात आहे." राणेंनी कार्यकर्त्यांनाही आठवण करून दिली – "सरकार आणणं हे तुमचं काम आहे, पण त्यानंतर सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवणं हीही तुमचीच जबाबदारी आहे. आम्ही ज्या पदांवर आहोत, ती कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आहोत आणि ती ताकद तुम्हाला अजून बलवान करण्यासाठीच वापरणार आहोत." त्यांच्या या भाषणाने सभागृहात एकच संदेश घुमला – हिंदूंचं सरकार आहे, आणि ते हिंदूंसाठीच लढणार आहे.