Thursday, August 14, 2025

मौनात नादब्रह्माच्या लहरीत लोपते ‘मी’

मौनात नादब्रह्माच्या लहरीत लोपते ‘मी’

ऋतुराज: ऋतुजा केळकर


नाद’ म्हणजे केवळ कानांनी ऐकण्याचा अनुभव नाही तर तो अस्तित्वाच्या गाभ्यातून उठणारा आदिम कंप आहे. जिथे शब्द संपतात न तिथे नाद सुरू होतो. नादब्रह्म ही संकल्पना सांगते की ध्वनी हा केवळ माध्यम नसून तो ब्रह्माशी एकात्म होण्याचा मार्ग आहे. जेव्हा मन स्थिर आणि साक्षीभावाने नादाकडे पाहतं तेव्हा ‘मी’ ही संकल्पनाच लुप्त होते. मग त्या क्षणी उरतो तो एक शुद्ध, गूढ अनुभव की जो शब्दांत मांडता येत नाही पण मनाच्या मौनात स्पष्ट ऐकू येणारा. नाद हा ब्रह्माचा पहिला स्पर्श आहे. तो “आहे” आणि “नाही” यामधला पूल आहे. तो प्रत्यक्ष ऐकू येणारा असतो आणि त्याचवेळी अनिर्वचनीयही आहे. उपनिषदांमध्ये म्हटले आहे: “नादं ब्रह्म इति…” अर्थात नाद म्हणजेच ब्रह्म.


‘मी’ म्हणजे एक व्यक्तिमत्त्वाचा कवच आहे. या मीमध्ये अनुभवांचा संचय, आठवणींचा पसारा आणि सामाजिक ओळखींचा भार आहे. मी हा कायम भूतकाळात अडकलेले एक सावलीमय अस्तित्व आहे की जे सतत स्वतःला परिभाषित करायला धावणारे. पण नादब्रह्म आहे शुद्ध वर्तमानाचे स्पंदन. ते शब्दांच्या पलीकडे असते, अगदी विचारांपलीकडे. तो संवाद आपल्या आत्म्याशी असतो, पण तो मौनातून असतो. तो कंपन आहे जो ‘मी’च्या सीमांना ओलांडून जातो आणि जागृतीच्या दाराशी आपल्याला उभं करतो.


जिथे ‘मी’ सीमा आखतो हे माझं... ते माझं नाही... यात गुंतून राहतो... तिथे नाद त्या सीमा अतिक्रमित करतो. जसं एखादं ध्वनीलहरींचं तरंग शांत सरोवरात फाकत जातं, तसं नादब्रह्म आपल्याला मुक्ततेच्या काठावर घेऊन जातो.


मनुष्याचं जीवन म्हणजे प्रपंचाचा सतत चालणारा प्रवाह आहे. घर, नातेसंबंध, जबाबदाऱ्या, संघर्ष आणि समाधानाचा शोध म्हणजेच प्रपंच होय. या सगळ्यांत मन अनेक भावना, शंका आणि अपेक्षांमध्ये गुंतून जातं. जेव्हा हे सर्व मनाला थकवतं, तेव्हा तो थोडा थांबतो, शांततेकडे पाहतो आणि मौनात उतरतो. अशा क्षणी नादब्रह्म प्रकट होतं ते एक सूक्ष्म स्पंदन, जो बाह्य ध्वनी नाही तर आंतरिक जागृती म्हणून.


नादब्रह्म हे जीवनाशी संवाद साधणारी चेतना आहे. जेव्हा मन ध्यानात शांत होतं, तेव्हा नाद त्याच्या आत झिरपत जातो. यात चिंता विरघळतात, विचार थांबतात आणि सजगता उगमते. “मी” ही असुरक्षित ओळख तिथे गळून जाते आणि उरते निर्मळ अस्तित्व. नाद साक्षीभाव जागवतो. भावना पाहण्याची क्षमता देतो, संघर्ष समजून घेण्याचं सामर्थ्य देतो. तो प्रपंचाला नाकारत नाही, तर त्याच्या गर्भातून समाधान शोधतो.


हीच नादाची लहर संकटांमध्येही शांती देणारी ठरते. जुन्या विचारांचं विलयन आणि नव्या भानाचं निर्माण हेच नादब्रह्माचं कार्य आहे. जे मनात समत्व, संयम आणि मुक्तीची अनुभूती जागवतं. म्हणूनच, नादब्रह्म हे अंतर्मनाचं शुद्ध कंपन आहे, जे प्रपंचातील गोंधळ, संघर्ष आणि “मी”ची सीमा पार करून आत्मशांती आणि सजगता उगमवतं. नाद हे जीवनाशी संवाद साधणारं मौन आहे, जे मनुष्याला प्रपंचात असतानाही मुक्ततेचा अनुभव देतं.


अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचे झाले तर,


मौनात गुंजे नादब्रह्म, अंतर्मनात शांती सावळे,


प्रपंचाच्या गोंधळातून, सजगता ज्यात फुलते झुळझुळे।


“मी” लोपतो त्या लहरीत, अस्तित्व होतं निर्मळ,


संवाद शब्दांशिवाय, अनुभवतो जीवन अमोल।

Comments
Add Comment