मिथ्या अहंकार सोडी जीवा...!


मनाचा गाभारा : अर्चना सरोदे


संसार म्हणजे मुले-बाळे, घरदार नव्हेत. संसाररूपी सर्पाचे अहं व मम हे दोन विषारी दात आहेत. जे लोक हे दोन विषारी दात काढून टाकतील त्यांना भवसर्पाचे भय न राहता गारुडी जसा सर्पाशी खेळतो त्याप्रमाणे तेही संसाररूपी सर्पाशी खेळू शकतात. कसे आहे ना, मी व माझे यातून आपली सुटका करुन घेणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात न सापडणे. मम आणि माझे या दोन्ही गोष्टी मिथ्या आहेत हे ज्यांना विवेक बुद्धीने उमगते त्यांना जन्म मरणाची, संसाराची भीती राहत नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे “तुका म्हणे गर्भवासी, सुके घालावे आम्हासी,” असे भगवंताकडे मागण्याचा अधिकार मिळतो.


संत एकनाथ महाराजांनी भागवतात म्हटले आहे की,


अहं देह हे समूळ मिथ्या ।


‘अहं नारायण’ हें सत्य तत्त्वतां ।


ऐशी भावना दृढ भावितां ।


ते भावनाआंतौता अभिमान विरे॥


म्हणजेच “अहं देह” ही भावना सोडून “अहं नारायण” ही भावना दृढ केल्याने साधकाला अभिमान आणि अहंकारावर मात करता येते. पण हा मीपणा जाणे फार कठीण असते. तो गुरुकृपेने किंवा गुरुसेवेने जातो. स्वामी विवेकानंद म्हणतात, उन्नतीच्या दिशेने आक्रमण केवळ ग्रंथांच्या सहाय्याने होणे शक्य नाही. एका जीवात्म्याला जे चालन मिळवायचे ते दुसऱ्या जीवात्म्याकडूनच मिळते. ते त्याला कोणत्याही जड वस्तूकडून प्राप्त होत नाही.


गुरू म्हणजे मोठा आणि लघू म्हणजे लहान हे आपण शिकलो आहोतच. कोणालाही लघू होणे म्हणजेच लहान होणे, अपमानास्पद किंवा निष्ठूर वाटू शकते. म्हणूनच शास्त्रामध्ये विविध तापातून व भवबंधातून मुक्त होण्यासाठी गुरुला शरण जावे असे सांगितले आहे. प्रत्येकाला गुरुत्व म्हणजे मोठेपणा हवा असतो; परंतु लघुत्व म्हणजे लहानपणा नको असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धाकुटे होईजे । ये जवळीक माझी ।।


म्हणजेच मी दुसऱ्याला मोठेपणा दिला की आपोआपच आपल्याकडे लहानपण येतं आणि हे साधण्यासाठी गुरुसेवा केली पाहिजे. गुरू आज्ञा पाळली पाहिजे. गुरू आज्ञेने अहंता नाहीसा होते. अहंता नाहिशी होणे म्हणजेच लहान होणे आणि मग अहंकाराबरोबरच ममकार ही पळून जातो.


समर्थ रामदास स्वामी म्हणतात की,


सेवेलिची सेवावे अन्न, घेतलेचि घ्यावे जीवन ।।


तैसे श्रवण मनन, केलेचि करावे ।।


या ओळींचा अर्थ असा आहे की,


अन्न जसे आपण सेवन करतो, तसेच त्याचा आदर करून योग्य प्रकारे त्याचा उपयोग करावा. जीवन आपल्याला मिळाले आहे, त्याचा योग्य प्रकारे उपयोग करावा, त्याला वाया न घालवता आपण जे काही शिकतो, ऐकतो किंवा वाचतो, त्याचा नीट विचार करून, त्याचा आपल्या जीवनात उपयोग करणे आवश्यक आहे.


या ओळींमधून आपल्याला शिकायला मिळते की, आपण जे काही करतो, ते विचारपूर्वक आणि योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.


Comments
Add Comment

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,

पितृऋण

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे हिंदू धर्माने सांगितलेली चार ऋणे म्हणजेच देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण.

विश्वामित्र

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी विश्वामित्रांच्या चरित्राला किंबहुना सर्वच ऋषीवरांच्या चरित्राला असलेल्या

खरे शहाणे

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै जीवनविद्येचे कार्य क्रांतिकारक आहे. क्रांतिकारक म्हणजे काय तर लोकांची मानसिकता

देवाणघेवाण

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात

निर्माल्य

ऋतुराज : ऋतुजा केळकर “ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त :...” मंत्रपुष्पांजलीचे खडे सुस्वर स्वर घरात प्रातःकाळी घुमायला लागले.