
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत १९८८ च्या तत्कालीन प्रशासकांनी गणेशोत्सव, १५ऑगस्ट यासह पाच ते सहा दिवस शहरात कत्तलखाने आणि चिकन मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. तेव्हापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. पण आता महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्याचे लक्षात येताच राजकीय पक्षांनी या मुद्यावरुन राजकारण सुरू केल्याची चर्चा आहे.
राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयाच्या आवारात मांसाहार करू आणि कोंबड्या सोडू असे इशारे देत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. विरोधकांनी निर्णय मागे घेण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणला आहे. याचवेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महापालिकांनीही केली आहे. यामुळे निर्णयावर ठाम असल्याचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल म्हणाले.