Wednesday, August 13, 2025

पाकिस्तानचा २०२ धावांनी दणदणीत पराभव करत विंडीजने २-१ ने जिंकली वनडे मालिका

पाकिस्तानचा २०२ धावांनी दणदणीत पराभव करत विंडीजने २-१ ने जिंकली वनडे मालिका

त्रिनिदाद :  वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा २०२ धावांनी पराभव केला. आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. या विजयासह विंडीज संघाने इतिहास रचला आहे. शाई होपच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजने ३४ वर्षांनी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली. वेस्ट इंडिजने याआधी १९९१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली होती. संघाच्या या ऐतिहासिक विजयात कर्णधार शाई होप आणि जेडेन सील्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने पाच विकेट्सने जिंकला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजने दुसरा एकदिवसीय सामना पाच विकेट्सने जिंकला होता. यासह वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पराभवाचा बदलाही घेतला. पाकिस्तानने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. शतकवीर होपला सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यातआले. तर मालिकेत तीन सामन्यांमध्ये सर्वाधिक १० विकेट्स घेणारा जेडेन सील्स मालिकावीर ठरला.


वेस्ट इंडिजने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचे पहिले चार फलंदाज अपयशी ठरले. संघाचे आठ फलंदाज दुहेरी अंकाचा टप्पा गाठू शकले नाहीत. यातील पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. संघ २९.२ षटकांत ९२ धावांवर आटोपला. सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, कर्णधार रिझवान, हसन अली आणि अबरार अहमद यांना खातेही उघडता आले नाही. त्याच वेळी बाबर आझम फक्त नऊ धावा करू शकला. सलमान आगा ३० धावा, हसन नवाज १३ धावा आणि मोहम्मद नवाज नाबाद २३ धावा दुहेरी अंकाचा टप्पा ओलांडू शकले. हुसेन तलत एक धाव घेत बाद झाला आणि नसीम शाह सहा धावा काढून बाद झाला. वेस्ट इंडिजकडून जादेन सील्सने ७.२ षटकांत १८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोतीला दोन फलंदाजांना बाद केला. चेसने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment