Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात पाकिस्तानच्या वायुदलाची एफ-१६ विमाने नष्ट झाल्याच्या भारताच्या दाव्यावर अमेरिकेने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळत 'तुम्ही या संदर्भात पाकिस्तान सरकारशी संपर्क साधावा' असे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या वायुदलाकडे असलेली एफ-१६ विमाने अमेरिकेकडून मिळाली आहेत. त्यामुळे, या विमानांशी संबंधित सर्व माहिती अमेरिकेकडे असते. या विमानांची देखरेख करण्यासाठी अमेरिकेची एक २४ तास कार्यरत तांत्रिक टीम पाकिस्तानमध्ये तैनात असते. दोन्ही देशांमधील करारानुसार पाकिस्तानला ही विमाने युद्धात वापरण्याची परवानगी आहे, आणि त्यामुळेच अमेरिकेला आपली टीम तिथे ठेवावी लागते. ही टीम एफ-१६ विमानांच्या स्थिती, देखभाल आणि ऑपरेशनल माहितीवर सतत लक्ष ठेवते. सध्या पाकिस्तानकडे सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत.

२०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकनंतर झालेल्या हवाई संघर्षात भारताने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ मधून एक एफ-१६ विमान पाडल्याचा दावा केला होता. त्यावेळी अमेरिकेने तातडीने निवेदन जारी करत, 'पाकिस्तानमधील एफ-१६ विमानांची मोजणी केली असून, कोणतेही विमान गायब नाही,' असे म्हटले होते. पण आता 'ऑपरेशन सिंदूर'च्या प्रकरणात अमेरिकेची भूमिका पूर्णपणे वेगळी असून, त्यांनी मौन बाळगले आहे.

भारताचा असा ठाम दावा आहे की, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानची अनेक एफ-१६ विमाने नष्ट झाली आहेत. ही विमाने कधी भारतीय हल्ल्यांमुळे जमिनीवर, तर कधी हवाई संघर्षात नष्ट झाली. या ऑपरेशनच्या तीन महिन्यांनंतर, भारतीय वायुदलप्रमुखांनी नुकतेच सांगितले की, 'शाहबाज-जैकबाबाद हे एक महत्त्वाचे एअरबेस होते, जिथे आमचा हल्ला झाला. तिथे एक एफ-१६ हँगर होता, जो अर्धा नष्ट झाला आहे. मला खात्री आहे की, त्यात काही विमाने होती, जी त्यावेळी नष्ट झाली आहेत.' या संपूर्ण प्रकरणात अमेरिकेची सावध भूमिका भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय बनली आहे.

Comments
Add Comment