Wednesday, August 13, 2025

गोबेल्सचा अवतार

गोबेल्सचा अवतार
गोबेल्स दुसऱ्या महायुद्धाच्या काळात होऊन गेला असला, तरीही त्याचे खोटा प्रचार आणि सातत्याने तेच ते बरळणे जगाच्या इतिहासात कायम राहिले आहे. या गोबेल्सचे नवे अवतार आहेत, आपले ५५ वर्षांचे युवराज राहुल गांधी. त्यांनी भाजपवर मतचोरीचा आरोप करताना सारख्या त्याच त्याच गोष्टी सांगण्याचा सपाटा लावला आहे आणि कालांतराने सातत्याने तेच तेच बोलत राहिल्याने लोकांनाही त्यात तथ्य आहे असे वाटू लागण्याचा संभव आहे. गोबेल्स असाच यशस्वी झाला होता. राहुल यांना ठाऊक आहे, आपला पक्ष लोकांमध्ये निवडून येऊ शकत नाही आणि त्यामुळे भाजपवर सातत्याने आरोप करत राहणे हेच एक त्यांनी मूलमंत्र म्हणून स्वीकारले आहे. राहुल यांनी मतचोरीचा आरोप केल्यानंतर भाजपने त्याची तपासणी केली असता त्यातील काही आरोप निव्वळ चुकीचे आहेत असे दिसून आले आहे. महादेवपुरा या कर्नाटकातील मतदारसंघात घोटाळा झाल्याचा आरोप राहुल यांनी केला. पण महादेवपुरातच नव्हे तर इतर चार मतदारसंघांत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राहुल यांच्या सततच्या आरोपांमुळे भाजपही आक्रमक झाला असून मुख्यमंत्री फडणवीस यानी राहुल यांच्या मेंदूतील चिपची चोरी झाली आहे असा आरोप केला आहे. मतांची चोरी करून भाजप सत्तेत आला आहे, हा राहुल गांधी यांचा आरोप आहे. त्याच्या निवडणूक आयोगाने ठिकऱ्या उडवल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा ही राहुल यांची प्रयोगशाळा आहे. त्यांनी महाराष्ट्रात मतदारांची संख्या वाढली आणि त्याचा फायदा भाजपला झाला असा आरोप केला होता. पण त्यातील हवाही निवडणूक आयोगाने काढली आहे. शकुन राणी यांच्यावर राहुल यांनी आरोप केला होता, की त्यांनी दोन वेळेस मतदान केले. त्या राणी यांनी आपण एकदाच मतदान केले, असे सागितले आहे. निवडणूक आयोगाने राहुल यांना या आरोपाबाबतची अधिक माहिती सादर करण्यास सांगितले आहे. त्यातच राहुल यांची हवा गेली आहे. पण, ‘गिरे तो भी टांग उपर’ या न्यायाने राहुल कबूल करणार नाहीत आणि आयोगावर आणि भाजपवर आरोप करत राहणार हे सत्य आहे. वास्तविक राहुल हे भाजपच्या विजयाने अस्वस्थ झाले आहेत आणि त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या विरोधी पक्षांप्रमाणे जनतेत जाऊन काम करणे अपेक्षित आहे. पण ते न करता भाजप आणि आयोगावर आरोप करत राहणे हा त्याचा रडीचा डाव आहे. राहुल सातत्याने तो खेळ खेळत आले आहेत आणि युवराज असल्याने सर्व जनता आपल्या मागे असल्याचा भ्रम त्यांना आहे. पण तसे असते, तर निवडून पुरेसे संख्येने का आले नाहीत? या प्रश्नाचे उत्तर राहुल यांच्याकडे नाही.

राहुल यांना एकच माहीत आहे, की गोबेल्सप्रमाणे एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने ती आज ना उद्या जनतेला पटल्याशिवाय राहणार नाही. पण तसे होत नाही आणि गोबेल्सच्या बाबतीतही ते झाले नव्हते. राजकारणात खोटेपणा काही मर्यादेपर्यंत केला जातो. पण, कायमस्वरूपी तो चालत नाही आणि करताही येत नाही. राहुल यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष सातत्याने नौटंकी करत आहेत. कधी लोकसभेत व्होट चोरीचा आरोप करतात, तर कधी बिहारच्या मतदार याद्यांच्या पडताळणीत बोगस मतदारांची नावे शोधून त्यांना वगळण्यात येत असल्याने काँग्रेस आणि राजद हे अस्वस्थ झाले आहेत. मग हा प्रयोगच कसा फसवा आहे ते सांगणे. कारण हेच दोन पक्ष आहेत, की ज्यांना या मतदारांच्या नावाने गोंधळ घालता येत होता. आपल्या आरोपांची जनता गंभीर दखल घेत नाही हे पाहून विरोधकांनी संसदेवर मोर्चा काढला. हे देशविरोधी पाऊल आहे आणि याचा अर्थ एक आहे, की विरोधकांनी आता सरळसरळ अराजकतावादी भूमिका स्वीकारली आहे. स्वतःच्या अपयशामुळे जागा गमावल्या आणि खापर मात्र आयोगावर आणि भाजपवर हे विरोधकांचे नेहमीचे तंत्र आहे आणि ते जनता स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही. पंतप्रधान मोदी यांना सत्तेवरून दूर करणे हा विरोधकांचा एकमेव अजेंडा आहे आणि या ना त्या प्रकारे ते शक्य नाही असं दिसताच त्यांनी हे रडीचे डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. आपले आरोप सिद्ध करता येणे शक्य नाही हे कळून चुकल्यामुळे राहुल असोत किंवा राजद असो, त्यांच्यापुढे सध्या एकच मार्ग आहे, तो म्हणजे देशात अशांतता फैलावण्याचा पवित्रा स्वीकारणे. तोच मार्ग सध्या विरोधी पक्षांनी वापरला आहे. काँग्रेसने भाजपवर मतचोरीचा आरोप केला असतानाच सिद्धरामय्या यांच्या सरकारातील एक मंत्री राजण्णा यांनी मतचोरीचा आरोप अस्वीकारार्ह असल्याचा मुद्दा काढला तेव्हा राहुल यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. राजण्णा यांनी राजीनामा दिला आहे. म्हणजे राहुल यांच्या या आरोपाची नौटंकी त्यांच्या पक्षातही सर्वांना मान्य नाही. त्यामुळे राहुल किती खोटे बोलतात हे सिद्ध झाले आहे. राहुल असो, की इंदिरा गांधी असोत, की काँग्रेसचा कुणीही नेता, त्याने राष्ट्रहिताला कायम दुय्यम लेखले आहे आणि त्याचीच शिक्षा ते आज भोगत आहेत. पण, अजूनही राहुल यांच्यासारखा बालबुद्धीचा नेता ज्याला काँग्रेसजन 'युवराज' म्हणतात. त्याला बुद्धी सुचत नाही. हेच खरे. वास्तविक राहुल यांचे मतचोरीचे आरोप आणि आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले, की पळून जाणे याला जनताही कंटाळली आहे. महाराष्ट्रातही ईव्हीएम हॅक होतात, असा आरोप झाला होता आणि आयोगाने जेव्हा महाराष्ट्रातील सर्व पक्षांना हा आरोप सिद्ध करण्यासाठी बोलावले, तेव्हा अजित पवार यांच्यासह सारे लोक गैरहजर राहिले. फक्त आरोप करणे सोपे असते पण तो सिद्ध करणे अवघड असते हे त्याना माहीत आहे. राहुल यांनी तर कित्येकदा माफी मागितली आहे आणि खरे तर माफीवीर तेच आहेत! पण त्यांनी माफी मागितली, की काहीच बोलायचे नाही असे मौन पाळून बसण्याची सवय काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी स्वत:ला लावून घेतली आहे. राहुल यांची ताजी नौटंकी ही त्यांच्या याच मालिकेतील एक भाग आहे आणि यामुळेच ते सत्तेत येणार नाहीत. राहुल जितक्या लवकर हे ओळखतील तितके त्यांच्यासाठी चांगलेे.
Comments
Add Comment