
नवी दिल्ली: भाजपने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्या मतचोरी आरोपांना प्रत्युत्तर देताना "सोनिया गांधी यांचे नाव भारताचे नागरिक होण्याच्या तीन वर्षांपूर्वीच मतदार यादीत समाविष्ट होते." असा भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. त्यांनी हा केवळ आरोप केला नाही तर त्यासंदर्भात ठोस पुरावा देखील सादर केला आहे.
अमित मालवीय यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोनिया गांधींचे भारताच्या मतदार यादीशी असलेले संबंध निवडणूक कायद्यांचे घोर उल्लंघन आहेत, कदाचित यामुळेच राहुल गांधी अपात्र आणि बेकायदेशीर मतदारांना नियमित करण्याच्या बाजूने आहेत.
अमित मालवीय म्हणाले की, सोनिया गांधी यांचा जन्म १९४६ मध्ये इटलीमध्ये एडविज अँटोनिया अल्बिना मिनो म्हणून झाला होता, त्यांनी १९६८ मध्ये राजीव गांधींशी लग्न केले आणि भारतात आल्या. लोकप्रतिनिधी कायदा १९५० नुसार, भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती मतदार यादीत नोंदणी करण्यास पात्र नाही. मालवीय म्हणाले की, त्यांचे (सोनिया) नाव पहिल्यांदा १९८० मध्ये मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, ती भारतीय नागरिक होण्याच्या ३ वर्षांपूर्वी. त्यावेळी त्यांच्याकडे इटालियन नागरिकत्व होते.
सोनिया गांधी इटालियन नागरिक असताना मतदार यादीत नाव
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी यांचे नाव १९८० मध्ये मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, तर त्या १९८३ मध्ये भारतीय नागरिक झाल्या. त्याच वेळी, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी १९८० च्या मतदार यादीची एक प्रत शेअर केली, ज्यामध्ये नवी दिल्ली संसदीय मतदारसंघातील सफदरजंग रोड येथील मतदान केंद्र क्रमांक १४५ च्या मतदार यादीत इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी आणि मेनका गांधी यांची नावे नोंदली गेली होती. लोकप्रतिनिधी कायदा १९५० नुसार, जो व्यक्ती भारताचा नागरिक नाही तो मतदार यादीत नोंदणी करण्यास पात्र नाही. अमित मालवीय यांचा आरोप आहे की सोनिया गांधी त्यावेळी इटालियन नागरिक होत्या आणि हे कायद्याचे उल्लंघन आहे.
सोनिया गांधी यांचे नाव नागरिकत्वाशिवाय दोनदा मतदार यादीत समाविष्ट केले
अमित मालवीय यांनी दावा केला की, जनतेच्या संतापानंतर, १९८२ मध्ये सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्यात आले, परंतु जानेवारी १९८३ मध्ये ते पुन्हा जोडले गेले. ते म्हणाले की हे देखील नियमांविरुद्ध होते, कारण त्यावेळी त्यांना ३० एप्रिल १९८३ रोजी भारतीय नागरिकत्व मिळाले होते, तर मतदार नोंदणीसाठी निश्चित केलेली तारीख १ जानेवारी १९८३ होती. जाहिरात 'नागरिकत्वाशिवाय सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले गेले' भाजप नेत्यांनी आरोप केला की सोनिया गांधी यांचे नाव नागरिकत्वाशिवाय दोनदा मतदार यादीत समाविष्ट केले गेले, जे निवडणूक गैरव्यवहाराचे स्पष्ट उदाहरण आहे. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की राजीव गांधींशी लग्न केल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी त्यांनी भारतीय नागरिकत्वाचा स्वीकार केला.