Wednesday, August 13, 2025

Dadar Kabutar Khana : कबुतरखाना वाद तापला; मराठी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Dadar Kabutar Khana : कबुतरखाना वाद तापला; मराठी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मुंबई : दादर कबुतरखाना (Kabutar Khana Dadar) बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने आज, १३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आंदोलनाच्या आधीच दादर पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या होत्या. तरीसुद्धा आंदोलनाच्या वेळेस कबुतरखाना परिसरात कार्यकर्ते जमू लागले. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आंदोलनकर्त्यांनी यावेळी हा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक असल्याचा दावा केला.



दादरचा कबुतरखाना कायमस्वरूपी बंद करावा आणि कायदा न मानणारे तसेच पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या दुहेरी मागणीसाठी आज दादर कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवून इशारा दिला होता. तरीदेखील सकाळी ११ वाजल्यानंतर कबुतरखाना परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. परिस्थिती ताणली जाऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घडामोडीमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.




जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद


कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज (१३ ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारले होते. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर देण्याचा इरादा समितीने जाहीर केला होता. मात्र, आंदोलनाच्या आधीच दादर पोलिसांनी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या, ज्यामुळे हा मुद्दा आणखी पेटला. मराठी एकीकरण समितीने याला “मुस्कटदाबी” म्हणत निषेध व्यक्त केला. परिस्थिती बिघडू नये म्हणून कबुतरखाना परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दादर येथील जैन मंदिराचा मुख्य दरवाजा देखील पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात आला, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम राहिले.




कबुतरखाना परिसरातील दुकाने दुपारी १ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश


मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतरखाना परिसरात पोलिसांनी सुरक्षेची कडेकोट तयारी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी परिसरातील सर्व दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या ठिकाणी १५० हून अधिक मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून, शिवाजी पार्क, दादर, शाहू नगर, धारावी, व्ही बी नगर, माहिम आणि कुर्ला पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाची अतिरिक्त कुमकही बोलावण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण कबुतरखाना परिसर सकाळपासून छावणीचे स्वरूप धारण करताना दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >