
सियोल : दक्षिण कोरियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या पत्नी किम केओन यांना शेअर बाजारातील फसवणूक आणि लाचखोरी यासह अनेक आरोपांमुळे अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या सरकारी वकिलांनी माजी फर्स्ट लेडीच्या अटकेबाबत माहिती दिली आहे. दक्षिण कोरियामध्ये याआधी अनेक माजी राष्ट्राध्यक्षांना दोषी ठरवून जेलमध्ये टाकण्यात आले आहे, पण ही पहिलीच वेळ आहे की देशाच्या इतिहासात माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी हे दोघेही तुरुंगात आहेत.
सिओल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने ५२ वर्षीय माजी फर्स्ट लेडीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. सरकारी वकिलांनी किम यांच्या विरोधात “बेकायदेशीर कृत्यांचे” पुरावे देणारा ८४८ पानांचा अहवाल सादर केला होता. कोर्टाने पुराव्याशी छेडछाड होऊ शकते, या भीतीने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले. वॉरंट जारी झाल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली.
किम यांच्यावर भांडवली बाजार आणि आर्थिक गुंतवणूक कायद्यांचे तसेच राजकीय निधी कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. स्टॉक हेरफेर प्रकरणातील त्यांच्या कथित सहभागामुळे त्या अनेक वर्षांपासून वादात होत्या. राष्ट्राध्यक्ष म्हणून यून यांनी विरोधक-नियंत्रित संसदेने मंजूर केलेल्या तीन विशेष तपास विधेयकांना व्हेटो दिला होता, जे किम यांच्या विरोधात तपास करण्याची मागणी करत होते. शेवटचा व्हेटो नोव्हेंबरच्या शेवटी लावण्यात आला होता. त्यानंतर एक आठवड्यातच यून यांनी मार्शल लॉ लागू केला. एप्रिलमध्ये यून यांच्यावर मार्शल लॉ लागू केल्यामुळे महाभियोग चालवण्यात आला आणि त्यांना पदावरून हटवण्यात आले. १० जुलैला त्यांना अटक झाली आणि तेव्हापासून ते कोठडीत आहेत. त्यानंतर देशात जूनमध्ये आकस्मिक निवडणुका घेण्यात आल्या.