Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

लालबागचा राजा मंडळाकडून अग्निशमन दल घेते दिवसाला सव्वा लाख भाडे

लालबागचा राजा मंडळाकडून अग्निशमन दल घेते दिवसाला सव्वा लाख भाडे

भाडे कमी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक गणेश मंडळे कामाला लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे, त्याचा एक आराखडा तयार केला असून तो लवकरच जाहीर होईल. गणेशोत्सव उत्साहात साजरा करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीत अग्निशमन दलाचे बंब वापरण्यासाठी लालबागचा राजा गणेश मंडळांकडून दिवसाला सव्वा लाख रुपये भाडे घेतले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडत भाडे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

गणेशोत्सव काळात पोलिस विभागाने योग्य समन्वय राखावा, पुण्यात विसर्जन मिरवणुकांचे नीट नियोजन करावे. तसेच, 'ऑपरेशन सिंदुर' आणि विकसित राष्ट्राचा प्रवास सुरू असताना जे अडथळे येत आहेत, ते पाहता 'स्वदेशी' या दोन विषयांवर जनजागरण कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना केले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे मुंबई अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनीही झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच, मंडपासाठीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे पैसे माफ होणार आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

लालबागचा राजा येथील अग्निशमन बंबांना सवलत

मुंबईतील अनेक गणेश मंडळांजवळ अग्निशमन दलाचे बंब असतात ते लालबागचा राजा इथेही उभे असतात. मात्र, या सेवेसाठी महापालिकेकडून सव्वा लाख रुपये दिवसाला चार्ज केले जातात. मात्र, लालबागचा राजाचा इथे उभे असलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या रकमेत सूट द्यावी, अशी मागणी मंडळाने केली होती. त्यास, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच, गणेश मंडळाच्या खड्ड्यांबाबत १५ हजार रुपये प्रति खड्डा घेणार होते, तो आता २ हजार रुपये करण्यात आला आहे. मात्र, २ हजार रुपये देखील माफ होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती नरेश दहिबावकर यांनी दिली.

विसर्जनदिवशी सुट्टी मिळावी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २६ तारखेला मराठा बांधव मुंबईत येणार आहेत, त्याचे नियोजन देखील होणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून गणेश विसर्जनादिवशी मुंबईत सुट्टी मिळत असताना यंदा ती रद्द केली आहे. खासगी लोकांचा अनंत चतुर्दशी संदर्भात विचार करा आणि सुट्टी जाहीर करा, अशी मागणीही गणेश मंडळांनी केली आहे.

Comments
Add Comment