Thursday, October 23, 2025
Happy Diwali

जिल्ह्यातील परहूर गावात नवीन कारागृहाची उभारणी

जिल्ह्यातील परहूर गावात नवीन कारागृहाची उभारणी

हिराकोट किल्ल्यातील कारागृहात कैद्यांना अडचणींचा करावा लागतोय सामना

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये प्रशस्त कारागृह नसल्याने सध्या अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्यातील कारागृहात कैद्यांना ठेवण्यात येत आहे. याठिकाणी कैद्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अलिबाग तालुक्यातील परहूर येथे शासनाच्या जागेत नवीन कारागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलिबागमधील हिराकोट किल्ल्यात जिल्हा कारागृह आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा भार या कारागृहावर पडत आहे. सध्या जिल्हा कारागृहात २०० पेक्षा अधिक कैदी आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांवर लक्ष ठेवताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील परहूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहात ५०० ते १ हजार कैदी राहू शकणार आहेत. त्यामुळेच परहुर येथे शासनाच्या जागेत नव्यान कारागृह बांधण्याचा निर्णय घेण्य़ात आल्याचे समजले. दुसरीकडे या कारागृह उभारणीला परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. काही ग्रामस्थांनी कौटुंबिक निवारा म्हणून काही क्षेत्रांवर पक्की घरे बांधलेली आहेत. या क्षेत्रामध्ये सामाजिक वनीकरणामार्फत झाडांचे रोपणही झाले आहे. कारागृहाच्या बांधकामामुळे हजारो वृक्षांची कत्तली होणार आहे. त्यामुळे येथे बांधकाम करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.दरम्यान, परहूर येथे प्रस्तावित कारागृहाची क्षमता ५०० ते १ हजार कैदी असणार आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत मोजणी पूर्ण करून कारागृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. त्याचप्रमाणे माणगाव तालुक्यातही कारागृह बांधकामासाठीचा प्रस्ताव तयार आहे. ४.६६ एकर जागेत कारागृह बांधकाम होणार आहे. अलिबाग येथील जिल्हाकारागृहात कैद्यांसाठी जागा अपुरी पडत असल्याने अनेकवेळा मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तळोजा येथील कारागृहात न्यावे लागते. तेथून पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी वेळ आणि जादा मनुष्यबळ खर्ची पडत असतो, तर काही किरकोळ गुन्ह्यातील गुन्हेगारांना पोलीस कस्टडीसाठी पोयनाड, मांडवा, रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात ठेवावे लागते.
Comments
Add Comment