
आजकाल आपण हनी ट्रॅपबद्दलच्या बातम्या, घटना त्यातून वाढत चाललेली गुन्हेगारी वृत्ती, बदनामीच्या भीतीने घडणाऱ्या आत्महत्या याबद्दल रोज ऐकतो, वाचतो. या लेखात आपण हनी ट्रॅपबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हनी ट्रॅप म्हणजे एखाद्या आकर्षक किंवा मोहक व्यक्तीचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीला जाळ्यात अडकवणं, शक्यतो अडकवणारी व्यक्ती ही महिला असते. हा ज्याला अडकवायचं त्याच्यासाठी एक प्रकारचा मानसिक आणि भावनिक सापळा आहे. यात खोटं प्रेम, आकर्षण, जवळीक, आपुलकी किंवा शारीरिक संबंधांचे आमिष दाखवून समोरच्या व्यक्तीकडून पैसे, मालमत्ता, गोपनीय माहिती किंवा इतर वैयक्तिक फायद्याच्या गोष्टी मिळवल्या जातात.
पूर्वी गुप्तहेर संस्थांकडून गुप्त माहिती मिळवण्यासाठी याचा वापर केला जायचा. सोशल मीडियाच्या युगात याचे स्वरूप बदलले आहे आणि आता सर्वसामान्य व्यक्तीही यात अडकू शकतात. हनी ट्रॅप वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो, त्यापैकी काही प्रमुख कारणे म्हणजे ब्लॅकमेलिंग, समोरच्या व्यक्तीला त्यांच्या खासगी क्षणांचे, फोटो किंवा व्हिडीओ मिळवून अथवा तो सोबत असताना शारीरिक संबंध करतानाचे फोटो, व्हिडीओ काढून त्यालाच नंतर ब्लॅकमेल करणे, त्याला व्हिडीओ कॉलमार्फत नको त्या गोष्टी करायला सांगून त्याचे रेकॉर्डिंग करून घेणे आणि नंतर त्याला त्रास देणे असे विविध प्रकार हनी ट्रॅप करणारी व्यक्ती वापरत असते. आर्थिक फायदा हा यातील महत्त्वाचा भाग आहे. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींकडून पैसे, मालमत्ता किंवा इतर आर्थिक फायदे मिळवण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो. एकदा समोरचा ब्लॅकमेलिंग, सामाजिक बदनामी, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हे समजलं तर नोकरी जाईल, व्यवसायावर परिणाम होईल, समाजात बाहेर कुठे हे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले तर काय होईल याला घाबरून जातो. अशा तणावात्मक परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला वारंवार धाक दाखवून मोठ्या रकमेची मागणी केली जाते. एखाद्या व्यक्तीकडून गुप्त माहिती मिळवण्यासाठी जसे की सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ किंवा उच्च पदावरील व्यक्तींकडून देशाच्या सुरक्षेशी संबंधित किंवा इतर गोपनीय माहिती मिळवणे, कार्यालयीन माहिती, राजकीय डावपेच, मोठे व्यवहार, महत्त्वाचे निर्णय याबद्दल माहिती काढणे हनी ट्रॅपद्वारे सहज शक्य होते.
राजकीय हेतू हनी ट्रॅपमध्ये अनेकदा पाहायला मिळतो. राजकीय विरोधकांना बदनाम करणे किंवा त्यांच्याकडून चुकीचे निर्णय घ्यायला लावून राजकीय फायदा मिळवणे, महत्त्वाचा राजकीय निर्णय अथवा घडामोडीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी, राजकीय भूमिका बदलण्यासाठी, नेते अथवा पक्ष फोडीसाठी सुद्धा हनी ट्रॅप वापरला जातो. राजकीय पद मिळवणे, राजकारणात पुढे जाणे, उच्चपदस्त नेते मंडळीशी जवळीक साधणे, त्यांच्याकडून कामे करून घेणे यासाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो. आपल्या कामाचे क्षेत्र कोणतेही असो आपण हनी ट्रॅपमध्ये अडकणार नाही. यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. अगदी तरुण मुलं-मुली, वयोवृद्ध सुद्धा अशा सापळ्यात अडकत असतात. त्यामुळे आपलं वय कितीही असले तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हनी ट्रॅपमध्ये पुरुष कसे अडकतात यावर अभ्यास केला असता काही मुद्दे प्रकर्षाने लक्षात येतात. मुख्य म्हणजे आजकाल प्रत्येकजण समाज माध्यमातून, मोबाईल, लॅपटॉपवरून विविध अॅप्लिकेशन, साईट्स हे नियमित वापरत असतात, अनेक नोटिफिकेशन आपल्याला येत असतात, अनेकदा विविध मेसेज, लिंक्स तपासून न घेता त्या उघडून पाहण्याची इच्छा होईल अशा प्रकारे तयार केलेल्या असतात. अशाच वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून सोशल मीडियावर पुरुषांशी ओळख करून ती वाढवली जाते. फेसबुक, इन्स्टाग्राम, डेटिंग एप्स किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आकर्षक प्रोफाइलच्या माध्यमातून ओळख केली जाते. जवळीक झाल्यावर, समोरील व्यक्तीने आपला विश्वास संपादन केला आहे. हे लक्षात आल्यावर या सोशल मीडियावरील एकमेकांशी केलेल्या चॅटिंगचा, शेअर केलेले फोटो, व्हिडीओ आणि माहितीचा वापर करून समोरील व्यक्तीवर दबाव आणला जातो. जेव्हा कोणत्याही पुरुषाने भावनेच्या भरात काही आक्षेप हाय चॅटिंग केलेले असेल, मागणी केली असेल त्याला सावज बनवले जाते.
भावनिक नातं तयार करून ही व्यक्ती हळूहळू तुमच्याशी गोड बोलून जवळचं नातं निर्माण करते आणि तुमचा विश्वास जिंकते. त्यानंतर खासगी माहितीची देवाणघेवाण सुरू होते. जसे की समोरील व्यक्ती तुमच्याकडून तुमच्या खासगी आयुष्याबद्दलची माहिती घेते. तुमचे वीकपॉइंट, सुखं, दुःखं, सवयी ओळखून तुमच्याशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. अगदी आपल्या कुटुंबाबद्दल, घर, नोकरी, उद्योग दैनंदिन रुटीन याबद्दल पण माहिती काढून घेतली जाते. अत्यंत संवेदनशील मुद्दा हनी ट्रॅपमध्ये अडकण्यासाठी कारणीभूत ठरतो. अनेकदा एखादी व्यक्ती व्हिडीओ कॉलवर अश्लील संभाषण किंवा कृती करण्याची मागणी करते. या क्षणांचे रेकॉर्डिंग करून ठेवले जाते त्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू होते. तुमच्याकडून पैशाची मागणी केली जाते किंवा काही गोपनीय महत्त्वाची माहिती द्यायला सांगितले जाते अथवा कोणतेही कामं जे जोखमीचे असेल ते तुमच्याकडून जबरदस्तीने करून घेतले जाते. हनी ट्रॅपपासून वाचण्यासाठी काय करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या सापळ्यात अडकण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. सामाजिक माध्यम वापरताना अनोळखी व्यक्तींशी सावधगिरी बाळगा. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सतर्क राहा, कोणतीही खोटी प्रोफाइल, खोटी माहिती खोटा फोटो टाकून बनवली आहे की खरंच अशी व्यक्ती अस्तित्वात आहे, कुठे आहे, काय करते याचा शहानिशा करा. कुठल्याही अस्तित्वात नसलेल्या, संबंध नसलेल्या सुंदर मुलींचे, महिलांचे इंटरनेटवरून फोटो वापरून, त्याला खोटं नावं वापरून विविध अॅप्लिकेशनवर टाकलेले असतात. त्या प्रोफाइलला हाताळणारे भलतेच लोकं असतात जे तुम्हाला हनी ट्रॅप करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात. त्यामुळे कितीही मोह झाला, आकर्षण वाटले तरी आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेऊनच सोशल मीडिया हाताळणे उचित आहे. कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुमच्या खासगी आयुष्याबद्दल, आर्थिक परिस्थितीबद्दलची माहिती शेअर करू नका. अनोळखी व्यक्तींसोबत व्हिडीओ कॉलवर खासगी किंवा अश्लील संभाषण टाळा. अशा परिस्थितीत कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट करू नका, पैशाची मागणी करणाऱ्यांपासून दूर राहा. जर कोणी तुमच्याकडे अचानक पैसे किंवा इतर मदतीची मागणी करत असेल, त्याचा हेतू योग्य वाटतं नसेल, तर लगेच सावध व्हा. अशा प्रकरणात पोलिसांची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल तर घाबरू नका. लगेच पोलिसांना याची माहिती द्या, कायद्याची मदत घ्या. जर तुम्हाला हनी ट्रॅपच्या कोणत्याही परिस्थितीत अडकल्याचा संशय आल्यास, कारवाई करण्यासाठी कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक यांची मदत घ्या, त्यांना विश्वासात घ्या, स्वतःची चूक मान्य करा, घाबरून, गडबडीत चुकीचा निर्णय घेणे टाळा. अशावेळी तुम्ही पोलिसांना किंवा सायबर सेलला संपर्क करू शकता.
- मीनाक्षी जगदाळे