
मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्याचा मुलगा, अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंदोक हिच्याशी झाला आहे. अत्यंत खासगी स्वरूपात हा सोहळा पार पडला असून, दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यात सहभागी झाले होते.
कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी?
सानिया चंदोक ही एक उद्योजक कुटुंबातील आहे. तिचे आजोबा रवी घई यांचा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि लोकप्रिय 'ब्रुकलिन क्रीमेरी' आईस्क्रीम ब्रँडही आहे. सानिया सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी, तिच्या कुटुंबाचा मुंबईतील उद्योगांमध्ये चांगला दबदबा आहे.
अर्जुनचे क्रिकेट करिअर
अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्यासाठी खेळतो. याआधी त्याने मुंबईकडूनही प्रतिनिधित्व केले आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे.
या साखरपुड्याबद्दल तेंडुलकर अथवा घई कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या बातमीने सोशल मीडियावर अर्जुनच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता सर्वांनाच त्यांच्या लग्नाच्या तारखेची उत्सुकता लागली आहे.