मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वेळ, पैसा आणि इंधन यांचा अपव्यय होतो. ध्वनी आणि वायू प्रदूषण यात वाढ होते. यावर उपाय म्हणून दहिसर टोल नाका सध्या आहे त्या ठिकाणावरुन आणखी दोन किमी. पुढे वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा करुन योग्य ते निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे; असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास, स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.