Monday, August 11, 2025

कोकणचे सौंदर्य

कोकणचे सौंदर्य

कोकण म्हणजे उंच हिरवेगार डोंगर, नद्या-अथांग समुद्रकिनारा! कोकणच्या या सौंदर्यात आणखी भर घालतात ती पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारी हिरवाई. ती तर एक सुंदर स्वप्नच. सर्वत्र पसरलेली भातशेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते. डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते. गढूळ पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पाश्वर्भूमीवर ऊन पावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कोकण असतं. कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचे मन मोहित करते.


महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाचा विचार करता इतर विभागांच्या तुलनेने पावसाळ्यात कोकण विभागात सर्वात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे निसर्गाचे खरे सौंदर्य हे पावसावर अवलंबून असते. कोकणामध्ये पावसाळ्यात जवळजवळ चार महिने अधूनमधून तुफान पाऊस होतो. याचा परिणाम नदीनाले व धरणे तुडुंब भरून वाहतात. यामुळे कोकणाचे हे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसते.यावर्षीही कोकणात राज्यातील अन्य भागांच्या तुलनेत पाऊस उत्तम झाला. शेती चांगलीच बहरली. पावसाने पेरणीपासून आता भात फुलोऱ्याला येईपर्यंत शेतकऱ्यांना चांगली साथ दिली. दरवर्षी वरुणराजा कोकणचं सौंदर्य अबाधित ठेवतो. पावसाळ्यात चारही महिन्यांत कोकणचा निसर्ग आपलं रूपडं पालटत असतो. कोकणचं खरं सौंदर्य बहरतं ते श्रावण आणि आश्विन महिन्यातच. श्रावणात कोकणची माळराने रानफुलांनी बहरतात. विविधरंगी रानफुले पाहताना रंगांनी भरलेला हा कोकण खूप सुंदर वाटतो. ऊन पावसाच्या खेळात ही रानफुले हिरव्या माळरानावर वाऱ्यासंगे डोलतात. निसर्गातील हे चमत्कार पाहायला मिळणं म्हणजे कोकणवासीयांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच. कोकणचं पर्यटन शांत, सुरक्षित आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत कोकणात आल्यावर सुद्धा हिरवेगार कोकण पाहायला मिळते. त्यात भात शेती केल्याने अधिक कोकणचे सौंदर्य वाढण्याला मदत होते. कोकणी माणूस सुद्धा सणासुदीच्या दिवसांत न विसरता आपल्या गावी जाऊन येतात. जरी बंद घरे असली तरी अधूनमधून चाकरमानी आपल्या गावी आल्यावर आपल्या घराभोवती वाढलेले गवत कोयतीने कापल्यामुळे घर सुद्धा लांबून आकर्षक दिसू लागते.


राज्यातील कोकण विभागाचा विचार करता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर असे सात जिल्ह्ये कोकण विभागात येतात. कोकण विभागाला जवळजवळ ७२० किलो मीटरचा निसर्गनिर्मित समुद्र किनारा लाभला आहे. कोकणातील जिल्हांवर समुद्र किनाऱ्याचा विचार करता रत्नागिरी जिल्हा (२३७ कि.मी.), रायगड जिल्हा (१२२ कि.मी.), सिंधुदुर्ग जिल्हा (१२० कि.मी.), ठाणे व पालघर जिल्हा (१२७ कि.मी.) आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा (११४ कि.मी.) लाभला आहे. कोकण विभागातील सात जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्याला २३७ किलो मीटर लांबीचा सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला असून सर्वात कमी मुंबई शहर व मुंबई उपनगराला ११४ किलो मीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. आता कोकणात गेल्यावर सर्वत्र हिरवाईने सजलेले कोकण दिसेल. त्यासाठी कोकणात जावे लागेल. विशेष म्हणजे झाडे, वेली आणि गवत यामुळे कोकणातील टेकड्या अधिक हिरवळीने नटून दिसतात. हिरव्यागार गवतावरून फिरताना मजा काही औरच असते. अक्षरश: जिकडे तिकडे हिरवेगार पाहून मनाला खूप समाधान वाटते. डोंगराच्या कड्यावरून कोसळणारा व फेसळणारा धबधबा. घनदाट जंगलातून नागमोडी वळणाची पायवाट आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे वेगळाच आनंद मिळतो. यामुळे टेन्शन फ्री व्हायला होते. हीच खरी कोकणची ओळख आहे. त्याचमुळे १९९९ साली कोकणातील निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून भारत सरकारने घोषित केला. ही कोकण विभागाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.


कोकणच्या सौंदर्याचा विचार करता कोकणातील डोंगर व माळरान पाहिल्यावर जिकडे तिकडे हिरवेगार दिसते. त्यामुळे मनाला खूप समाधान वाटते. अशा या हिरव्यागार नैसर्गिक चाऱ्यावर चालताना तान भूक नाहीशी होते. जणू काय स्वर्गात आल्यासारखे वाटते. त्याचा आनंद काय वेगळाच असतो. विशेष म्हणजे, सुंदर दिसणाऱ्या चाऱ्यावरून फेरफटका मारताना टेन्शन सुद्धा निघून जाते. त्यामुळे पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी पर्यटक भटकंतीसाठी मोठ्या प्रमाणात कोकणात येत असतात. सध्या त्यांची संख्या सुद्धा वाढते आहे. याची अनेक कारणे आहेत; परंतु त्यापैकी एक कारण म्हणजे निसर्गाचा आनंद होय. पर्यटक कोकणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. कारण निसर्गाची खरी ओळख कोकणात आल्यावर पर्यटकांना कळते. त्यात नागमोड्या नद्यानाले डोंगराच्या पायथ्याशी व मळ्यातून वाहताना पाहून मनाला आनंद वेगळाच होत असतो. त्यात घनदाट झाडे. त्यातून वाहणारी गार गार हवा अंगाला गारवा देऊन जाते. गाडीतून जाताना नागमोडी वळणे असल्याने पाहायला खूप मजा वाटते. नाही म्हटले तरी ससा किंवा रान डुकराचे बऱ्याच वेळा अकस्मात दर्शन होते. तसेच विविध पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. डोंगरात फिरताना हमखास मोराचे दर्शन होते. त्यात मजेशीर गंमत म्हणजे या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना माकडे पाहायला मिळतात. मी लहान असताना गुरांचा कळप सड्यावर चरताना पाहायला मिळत असे. आता तो पाहायला मिळत नाही. आता पाहायला दिसतात गवा रेड्यांचा कळप. तर शेतकऱ्यांच्या गोठ्यात दोन बैल किंवा गाय किंवा म्हशी पाहायला मिळतात. त्यामुळे बच्चे कंपनी अधिक खुशीत दिसतात. कारण गुराखी मुलांना गुरांजवळ घेऊन जातो. त्यांना हात लावतो. याची मजा जीवनात वेगळीच असते. तसेच माळरानावरील हिरव्यागार चाऱ्यावरून कुटुंबीयांसमवेत फिरताना पर्यटकांचे मन मोहीत करीत आहे. त्यामुळे बरेच पर्यटक सुट्ट्या घेऊन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात येत असतात.


सध्या श्रावण महिना सुरू असल्याने माळरान रंगीबेरंगी फुलांनी उजळून निघाला आहे. माळावरील हरणाची फुले तर पर्यटकांना आकर्षित करताना दिसतात. काही परदेशी पर्यटक हरणाची फुले तोडून कानाला लावून आनंद व्यक्त करताना दिसतात, तर संध्याकाळच्या सुमारास इंद्रधनुष्याचे सुद्धा दर्शन होते. त्यामुळे आलेले पर्यटक अधिक उत्साही होताना दिसतात. हल्लीकडे तर कोकणातील जांभा दगड पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. सर्रास कोकणात जांभ्या दगडांची घरे असून घराच्या आजूबाजूला नारळी-पोपळीच्या बागा आहेत. तेव्हा खळ्याच्या पेळयेवर बसल्यावर उन्ह असून सुद्धा झुळझुळणाऱ्या वाऱ्यामुळे मन कसे शांत होते. तेव्हा चला तर मग आता कोकणचे सौंदर्य पाहायला निसर्गरम्य कोकणात जाऊया.


- रवींद्र तांबे

Comments
Add Comment