Tuesday, August 12, 2025

Kabutarkhana: दादरमध्ये नवा कबुतरखाना! कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवत जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर कबुतरांसाठी सोय

Kabutarkhana: दादरमध्ये नवा कबुतरखाना! कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवत जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर कबुतरांसाठी सोय

मुंबई: कबुतरखाना बंद करण्यावरून दादर येथे मोठा वाद सुरू आहे. हा वाद कोर्टाच्या निर्णयानंतरही थांबलेला नाही, किंबहुना तो अधिकच वाढलेला आहे. कबुतर खाना आणि कबूतरांना कोणत्याही प्रकारचे खाद्य टाकण्यास बंदी असूनही जैन समाज आणि काही पक्षीप्रेमी कबूतरांना धान्य टाकण्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवताना दिसून येत आहे. याआधी कारच्या छतावर कबूतरांसाठी धान्य भरलेला ट्रे ठेवण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला होता, त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर आता, थेट इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरू करण्यात आल्याचे चित्र दिसून आले आहे. ज्याचा व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले असतानाही जैन मंदिराच्या शेजारील इमारतीच्या छतावर हा अनधिकृत कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे. ज्यामुळे परिसरातील स्थानिक लोकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.



जैन समाज आक्रमक


मागच्या आठवड्यात कबुतरखान्यावर लावलेल्या ताडपत्रीमुळे लोक संतप्त झाले आणि त्यांनी ताडपत्री फाडून काढत आंदोलन छेडले होते. त्यानंतर हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली. त्यानंतर जैन समुदायाने आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान आता दादर परिसरातील इमारतीच्या छतावर अनाधिकृतपणे रोज दाणे टाकण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येने कबुतर हे दाणे खाण्यासाठी येतात. ज्या इमारतीच्या छतावर कबुतरांना दाणे टाकण्यात येतात त्याच्या आजुबाजूला दादर कबुतरखाना, गोल मंदिर परिसर, जैन देरासर येथे जैन समुदाय मोठ्या संख्येने राहतो. जैन समुदायाच्या नागरिकांनी हा अनाधिकृत कबुतरखाना सुरू केला आहे. जैनसमुदायाच्या मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या इमारतीच्या छतावर हा कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment