राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणासाठी रास्त भाव दुकानदारांना सध्या देण्यात येणाऱ्या ₹१५०/- रुपये प्रति क्विंटल (₹१५०० प्रति मेट्रिक टन) या मार्जिन दरामध्ये ₹२०/- प्रति क्विंटल (₹२०० प्रति मेट्रिक टन) एवढी वाढ करून त्यांना ₹१७०/- प्रति क्विंटल (₹१७०० प्रति मेट्रिक टन) मार्जिन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजित वार्षिक ₹९२.७१ कोटी इतका अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गेले अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांची मार्जिन मध्ये वाढ करण्याची मागणी होती. याबाबत अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या. रास्त भाव दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक होते त्यामुळे मंत्रिमंडळाने रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.