Monday, August 11, 2025

दिव्यांगांसाठी आदर्श ‘घरकुल’

दिव्यांगांसाठी आदर्श ‘घरकुल’

वैशाली गायकवाड


डोंबिवलीपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या खोणी गावात, एका सेवाभावी प्रयत्नातून साकारले गेलेलं ‘घरकुल’ हे मतिमंद मुलांचं वसतिगृह, आज समाजसेवेचा आदर्श उदाहरण ठरतंय. या वसतिगृहाची स्थापना केवळ गरजेतून नव्हे, तर अपार प्रेम, समर्पण आणि दूरदृष्टी या मूल्यांवर झाली आहे. बर्वे कुटुंबीयांच्या या प्रयत्नाने मतिमंद मुलांच्या जगण्याला एक नवीन ओळख दिली आहे – जी सन्मानाची, आत्मियतेची आणि सुरक्षिततेची आहे.


शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शक संस्थेप्रमाणे कार्यरत असणाऱ्या नंदिनीताई बर्वे यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. दिव्यांगांची माऊली असणाऱ्या नंदिनीताईंचा जन्म पंढरपुर येथे झाला. मुलींच्या शिक्षणासाठी व नोकरीसाठी आग्रही नसलेल्या त्या काळातही जिद्दीने नंदिनीताईनी स्वतःचे बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अर्थातच लग्न होऊन त्या ठाणेकर झाल्या. त्यांचे यजमान अविनाश बर्वे हे शिक्षक होते. लग्नानंतर त्यांनी त्यांचे बी एडचे शिक्षण पूर्ण करून ठाण्यातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात अविरत कार्य केले. दोघांचेही शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य देखील चालूच होते. दोघेही उत्तम लेखकही आहेत.


दिव्यांग मुलांसाठी घरकुलसारखे निवासस्थान उभारण्याची सुरुवात झाली ती नंदिनी बर्वे आणि अविनाश बर्वे यांच्या वैयक्तिक आयुष्यातून. त्यांच्या मुलाचे कर्णबधिर आणि नंतर मतिमंद असल्याचे निदान झाल्यानंतर, त्यांनी या वास्तवाला धीराने स्वीकारलं. सामाजिक दबाव, मानसिक ताणतणाव आणि भावनिक आव्हानांवर मात करत त्यांनी आपल्या मुलासाठी योग्य पर्याय शोधायला सुरुवात केली. त्यांना ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मेजर ग. कृ. काळे यांच्याकडून मिळालेली प्रेरणा निर्णायक ठरली. काळे यांनी मांडलेली एक कल्पना – “पालकांच्या पश्चात देखील मतिमंद मुलांची काळजी कोण घेणार?” – या प्रश्नाने बर्वे दाम्पत्याच्या मनात खोलवर रुंजी घातली. त्यातूनच जन्म झाला ‘अमेय पालक संघटने’चा आणि त्यातून उभं राहिलं ‘घरकुल’. घरकुल हे एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. समाजाच्या मदतीवरच ते चालले आहे.


बर्वे कुटुंबाने यासाठी कोणतीही सरकारी मदत न घेता स्वतःच निधी उभा करण्याचा निर्णय घेतला. डोंबिवली सहकारी बँकेत एक विशेष खाते उघडून काही वर्षे निधी गोळा केला. पालकांनी एकत्र येत, आपापल्या क्षमतेनुसार नियमित पैसे भरायला सुरुवात केली. याच प्रयत्नातून खोणी गावात सव्वा एकर जागा विकत घेऊन ‘घरकुल’ ची वास्तू उभारली गेली.


आज या ‘घरकुल’मध्ये २० ते ६० वयोगटातील सुमारे ३० मतिमंद व्यक्ती गुण्यागोविंदाने राहतात. त्यांना एकमेकांचं सुखदुःख कळत नसलं तरी त्यांच्यामध्ये भावनिक बंध निर्माण झाले आहेत. घरासारखा अनुभव देणाऱ्या या संस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागवलं जातं. रोजच्या जीवनातील अंघोळ, जेवण, कपडे, स्वच्छता अशा सर्व गोष्टीत कर्मचाऱ्यांचं व बर्वे कुटुंबीयांचं अपरंपार प्रेम, सहकार्य सामावलेलं असतं.


‘घरकुल’मध्ये ठराविक शैक्षणिक अभ्यासक्रम नाही. येथे चित्रकला, नाटक, गायन, खेळ आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून मतिमंद मुलांचं व्यक्तिमत्त्व फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यातील क्षमतांना ओळखून, त्यांना एक सुसंस्कृत व सशक्त आयुष्य देणं हेच संस्थेचं ध्येय आहे. विशेष म्हणजे ही संस्था कोणत्याही मोठ्या दानशूर व्यक्तीकडे मदतीसाठी हात पसरवत नाही. संस्थेच्या खर्चाचा काही भाग पालक उचलतात, तर उर्वरित मदत मित्रमंडळी, नातेवाईक व समाजातील संवेदनशील व्यक्तींमधून मिळते. या संस्थेत कुणीही लहान-मोठं नाही. सर्वांना समान वागणूक, प्रेम आणि आदर दिला जातो. ‘घरकुल’ म्हणजे केवळ वसतिगृह नव्हे, तर ती एक कुटुंबसंस्था आहे जिथे प्रत्येकाला ‘स्वतःची’ अशी ओळख मिळते. असे कार्य करणाऱ्यांबद्दल समाजात आदर असतोच, पण अधिक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कृतीतून समाज बदलतो. मतिमंदांसाठी असलेली सहवेदना केवळ शब्दांत मर्यादित न राहता कृतीत उतरवली गेली, तरच समाज प्रगती करतो – आणि हेच काम ‘घरकुल’ करत आहे.


खोणी गावातील हे ‘घरकुल’ म्हणजे सामाजिक बांधिलकीचा एक जिवंत नमुना आहे. अविनाश बर्वे व नंदिनी बर्वे यांच्या पुढाकाराने आणि अनेक पालकांच्या सहभागातून उभं राहिलेलं हे वसतिगृह मतिमंद व्यक्तींसाठी केवळ निवारा नाही, तर त्यांचं स्वप्नांचं घर आहे. गेली २७ वर्ष अविरत कार्य करणाऱ्या या दांपत्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु हे घरकुलच या दोघांचे विश्व असल्याने त्याच्या भेटीसाठी आलेला प्रत्येक पाहुणा व त्यांनी केलेली सढळ हस्ते मदत हाच खरा पुरस्कार असल्याचे नंदिनीताई आवर्जून सांगतात


भविष्यात कोकणातील एका दुर्गम खेड्यात तेथील अभावग्रस्त पालकांच्या मतिमंद मुलांसाठी ‘घरकुल’ उभारण्याची योजना आहे. गुहागर चिपळूणच्या मधील चिवेली फाट्यावर कौंढर ताम्हणे या खेड्यात जागा घेतली आहे. त्यासाठीही आता समाजाकडून भरपूर मदत मिळण्याची अपेक्षा आहे.


संस्था कोणाकडे हात पसरवत नसली तरी समाजाच्या मदतीवरच हे चॅरिटेबल ट्रस्ट चालू आहे.समाजातील सर्वसामान्य मध्यमवर्ग हा संस्थेचा आर्थिक कणा आहे. पालकांकडून अतिशय कमीत कमी फी घेतली जाते. पारदर्शक व्यवहार आणि तत्परता हे अमेय पालक संघटनेचे वैशिष्ट्य आहे. येणाऱ्या प्रत्येक रुपयासाठी पावती दिलीच जाते आणि खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचे व्हाउचर असते. मुख्य म्हणजे विश्वस्तांचा एकही रुपयाचा भार संस्थेवर नाही. विश्वस्त आपल्या खिशातून खर्च करून येतात आणि संस्थेसाठी काम करतात. स्वतःही संस्थेसाठी खर्च करतात. "आम्ही स्वतः संस्थेत राहिलो आणि जेवलो तरी त्याची पावती फाडत असतो" पुढील विश्वस्तांसाठी हाच आदर्श आणि नियम घालून दिल्याचे नंदिनीताई प्रामुख्याने सांगतात.


सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या माणुसकीच्या झऱ्यातून साकारलेल्या या घरकुलाच्या भविष्यकालीन योजना या नक्कीच या मुलांचे भविष्य अधिकाधिक प्रकाशमान करतील•. अविनाश बर्वे आणि नंदिनी बर्वे यांनी बांधलेल्या या घरकुलाच्या पालखीचे भोई प्रत्येकाने होऊन अनेक हात या संस्थेस जोडले जाऊन दिव्यांगांसाठीचा हा नंदादीप अखंड तेवत राहो या सदिच्छेसह भरभरून शुभेच्छा.

Comments
Add Comment