Monday, August 11, 2025

हर तन तिरंगा

हर तन तिरंगा

तिरंगी फॅशन ट्रेंड! 


सौंदर्य तुझं : प्राची शिरकर


स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव! यंदाच्या वर्षी ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट हा दिवस केवळ ध्वजारोहण, देशभक्तीपर गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित नसतो, तर त्या दिवशीच्या पोशाखातसुद्धा आपलं देशप्रेम झळकून दिसायला हवं. या दिवशी शाळा, महाविद्यालय, ऑफिस, इतर अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी देशाच्या झेंड्यामध्ये असलेल्या तीन रंगाचा पोशाख परिधान केला जातो. या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महिलांसाठी खास १५ ऑगस्टच्या दिवशी परिधान करता येतील असे आकर्षक आणि स्टायलिश आऊटफिट्स...



देशभक्ती आणि सौंदर्याचा संगम


भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त राष्ट्रध्वज फडकवणे, भाषणे किंवा देशभक्तीपर गीते ऐकणे एवढ्यावरच मर्यादित नाही, तर तो आपल्या संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय अभिमान साजरा करण्याचा दिवस आहे. या दिवशी महिलांनी घालणारा पोशाख हा केवळ फॅशन नसून देशभक्तीचा आणि साजरीकरणाचा एक भाग ठरतो.



अॅक्सेसरीज आणि जुळवाजुळव


पोशाखाला पूरक असे दागिने आणि अॅक्सेसरीज निवडणे हा लूक पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. तिरंग्याच्या रंगातील कानातले, बांगड्या किंवा माळा. केसांसाठी केशरी किंवा हिरव्या रंगाचा गजरा. तिरंग्याच्या थीमवर आधारित ब्रूच किंवा बॅज लावणे.



मेकअप आणि हेअरस्टाईल


मेकअप नैसर्गिक ठेवावा. तिरंगा आयशॅडो किंवा तिरंगा आयलायनर, हलके काजळ, न्यूड किंवा लाइट लिपस्टिक आणि केसांमध्ये तिरंग्याच्या रंगाचा क्लिप किंवा रिबन यांचा वापर करून लूक अधिक उठावदार बनतो.



हस्तकला आणि पारंपरिक डिझाइन्स


१५ ऑगस्टला आपली परंपरा अधोरेखित करणारे भारतीय हस्तकलेचे पोशाख घालणे अधिक अर्थपूर्ण ठरते. खादी, हातमाग किंवा लिनेनचे कपडे परिधान करून आपण स्वदेशीची भावना जपतो. वारली पेंटिंग, मधुबनी, ब्लॉक प्रिंट किंवा फुलकरी यांसारख्या डिझाइन्सने सजलेले पोशाख विशेष उठून दिसतात.



तिरंगी साडी


जर तुम्हाला पारंपरिक लूक आवडत असेल, तर तिरंग्याच्या रंगांनी सजवलेली सिल्क, कॉटन किंवा खादी साडी एक उत्तम पर्याय आहे. पांढऱ्या साडीवर हिरवी बॉर्डर आणि केशरी ब्लाऊजसह लूक पूर्ण करा. यासोबत हलके दागिने आणि केसांत गजरा घातल्यास पूर्ण देशभक्तीचा लूक येतो.



अनारकली सूट


पांढऱ्या बेसवर तिरंगा बॉर्डर किंवा डिझाइन असलेला अनारकली सूट फारच उठावदार दिसतो. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या महिला आणि मुलींना एक स्टेज-रेडी लूक मिळतो.



पांढरा कुर्ता आणि तिरंगा दुपट्टा


वर्किंग वूमेन्स किंवा कॉलेज गर्ल्ससाठी हा लूक अगदी योग्य आहे. पांढऱ्या रंगाचा सिंपल कुर्ता आणि त्यावर केशरी-हिरव्या शेड्सचा दुपट्टा तुमचा साधेपणातला स्टायलिश लूक देईल. त्यासोबत प्लाझो किंवा चुडीदार लेगिंग्स परिधान करा.



सिंपल टॉप आणि जीन्स


खूप ड्रेसअप न करता सुद्धा तुम्ही देशप्रेम व्यक्त करू शकता. व्हाईट टॉप, डेनिम जीन्स आणि तिरंगा स्कार्फ किंवा बॅज लावून तुम्ही सुद्धा ‘इंडिपेंडन्स डे लूक’ पूर्ण करू शकता. कॅज्युअल तरीही देशभक्तीचा टच असलेला लूक.



व्हाइट को-ऑर्ड सेट्स


आजच्या मॉडर्न महिलांसाठी व्हाइट को-ऑर्ड सेट्स म्हणजे स्मार्ट आणि सहज स्टायलिश दिसण्याचा उत्तम पर्याय. त्यात शॉर्ट टॉप सोबत ट्राऊझर, क्रॉप टॉपसोबत स्कर्ट किंवा ब्लेझरसोबत पलाझो अशा विविध जोड्या मिळतात. यामध्ये थोड्या ब्रॉड लेस, कटवर्क किंवा सेम फॅब्रिक बेल्ट्स वापरून त्यात ट्रेंडी टच दिला जातो.



इंडो-वेस्टर्न लूक


जर तुम्ही फ्यूजन लूकमध्ये काहीतरी वेगळं घालायचं ठरवलं असेल, तर तिरंगी स्कर्टसोबत व्हाइट क्रॉप टॉप किंवा केशरी श्रग ट्राय करा. हाय पोनीटेल आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी यासोबत परफेक्ट जुळून येते.



Comments
Add Comment