Monday, August 11, 2025

गरोदरपणातला मधुमेह

गरोदरपणातला मधुमेह

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील


गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा काळ असतो. या काळात आईच्या शरीरात अनेक जैविक, हार्मोनल व मानसिक बदल होतात. या बदलांमुळे काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात, त्यापैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे गर्भधारणेत होणारा मधुमेह (Gestational Diabetes Mellitus – GDM). हा आजार योग्य वेळी ओळखून उपचार न केल्यास आई व बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.


गर्भधारणेत मधुमेह म्हणजे काय?


गर्भधारणेदरम्यान शरीरात काही हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे इन्सुलिनचे कार्य कमी होते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते. गर्भधारणेपूर्वी न झालेला पण गर्भधारणेदरम्यान प्रथमच आढळणारा मधुमेह म्हणजे गर्भकालीन मधुमेह. काही वेळा आईला गर्भधारणेपूर्वीच मधुमेह असतो, अशा अवस्थेला पूर्वअस्तित्वात असलेला मधुमेह म्हणतात.


कारणे व जोखीम घटक :


गर्भधारणेत मधुमेह होण्याची शक्यता वाढवणारे घटक पुढीलप्रमाणे –
३५ वर्षांपेक्षा जास्त वय
जास्त वजन (BMI > २५)
पूर्वीच्या गर्भधारणेत मोठ्या वजनाचे बाळ (४ किलोपेक्षा जास्त) जन्माला आलेले असणे.
कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणे.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)
पूर्वीच्या गर्भधारणेत गर्भकालीन मधुमेह झालेला असणे.


लक्षणे


गर्भधारणेत मधुमेह बहुतेक वेळा लक्षणविरहित असतो आणि केवळ तपासणीत आढळतो.
काही वेळा पुढील लक्षणे दिसू शकतात –
१) जास्त तहान लागणे
२) वारंवार लघवी होणे
३) थकवा जाणवणे
४) वजन जास्त वाढणे
५) दृष्टी धूसर होणे


तपासण्या


प्रत्येक गर्भवती महिलेला २४–२८ आठवड्यांच्या दरम्यान ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (OGTT) करून रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. जोखीम घटक जास्त असल्यास ही तपासणी लवकर केली जाते.


गर्भधारणेत मधुमेहाचे आईवर होणारे परिणाम


१) प्री-एक्लॅम्पसिया (उच्च रक्तदाब व सूज)
२) सिझेरियन शस्त्रक्रियेची गरज
३) मूत्रमार्गाच्या संसर्गाची शक्यता वाढणे
४) प्रसूतीदरम्यान गुंतागुंत वाढणे


बाळावर होणारे परिणाम
जास्त वजनाचे बाळ (Macrosomia)
जन्मावेळी कमी रक्तातील साखर (Hypoglycemia)
श्वसनास त्रास
नवजात पिवळेपन (Jaundice)
भविष्यात लठ्ठपणा व टाईप-२ मधुमेहाची शक्यता.


उपचार व व्यवस्थापन


१. आहार नियोजन
पालेभाज्या, डाळी, संपूर्ण धान्य, फळे व कमी साखरयुक्त पदार्थांचा आहार.
दिवसातून ५–६ वेळा लहान प्रमाणात खाणे.
तेलकट, गोड व जंक फूड टाळणे.
२. व्यायाम
रोज ३० मिनिटे चालणे, हलके स्ट्रेचिंग किंवा गर्भवतींसाठी सुरक्षित योगासन.
व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
३. औषधोपचार
आहार व व्यायामाने साखरेचे नियंत्रण न झाल्यास इन्सुलिनची आवश्यकता भासू शकते.
गर्भधारणेत गोळ्या फार कमी प्रमाणात वापरल्या जातात, कारण त्यांचा परिणाम बाळावर होऊ शकतो.
४. नियमित तपासणी
१) रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासणे.
२) गर्भवतीच्या व बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवणे.


प्रसूती नियोजन


साखरेचे नियंत्रण नीट असेल तर बहुतेकवेळा ३८–४० आठवड्यांच्या दरम्यान प्रसूती करता येते. बाळाचे वजन जास्त असल्यास किंवा इतर गुंतागुंत असल्यास लवकर प्रसूती करावी लागू शकते. प्रसूतीनंतर आईची साखर सामान्य होण्याची शक्यता असते, पण भविष्यात मधुमेह होण्याचा धोका वाढतो.


प्रसूतीनंतरची काळजी


प्रसूतीनंतर ६–१२ आठवड्यांत पुन्हा OGTT करून साखर तपासणे.
संतुलित आहार व नियमित व्यायाम सुरू ठेवणे.
पुढील गर्भधारणेत जोखीम कमी करण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे.
स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून माझा सल्ला


गर्भधारणेत मधुमेह हा एक गंभीर पण नियंत्रणात ठेवता येणारा आजार आहे. योग्य वेळी निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केल्यास आई व बाळ दोघेही निरोगी राहू शकतात. मी प्रत्येक गर्भवतीला सांगते – तपासण्या कधीही टाळू नका, स्वतः औषधे घेऊ नका आणि आपल्या बाळाच्या व आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या.

Comments
Add Comment