
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील ६,११५ रेल्वे स्थानकांवर मोफत Wi-Fi सुविधा देत आहे. ही माहिती सरकारने आज, मंगळवारी संसदेत दिली. रेल्वे स्थानकांवरील मोफत Wi-Fi सेवा ही ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल अंतर कमी करणे आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, “भारतीय रेल्वेच्या जवळजवळ सर्व स्थानकांवर दूरसंचार सेवा प्रदात्यांमार्फत 4जी/5-जी कव्हरेज दिले जात आहे. या नेटवर्कचा वापर प्रवासी डेटा कनेक्टिव्हिटीसाठी करीत आहेत, ज्यामुळे त्यांना अधिक चांगला अनुभव मिळत आहे. याशिवाय, रेल्वेने 6,115 स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे.
या स्थानकांवर प्रवासी मोफत वायफायचा वापर करून एचडी व्हिडिओ पाहू शकतात, मनोरंजन सामग्री डाउनलोड करू शकतात आणि ऑफिसचे कामही करू शकतात. वायफाय सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या स्मार्टफोनवर वायफाय मोड सुरू करावा लागतो आणि ‘RailWire’ Wi-Fi शी कनेक्ट व्हावे लागते. त्यानंतर त्यांना ओटीपी मिळवण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक द्यावा लागतो आणि ओटीपी टाकल्यावर वायफाय कनेक्टिव्हिटी मिळते.
ही वायफाय सेवा नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद अशा प्रमुख स्थानकांबरोबरच अनेक टियर-2 आणि टियर-3 शहरांतील स्थानकांवरही उपलब्ध आहे. यात सूरत, वडोदरा, राजकोट, मेरठ, भोपाळ यांसारखी टियर-2 शहरे तसेच रोहतक आणि कटक यांसारखी टियर-3 शहरे समाविष्ट आहेत.
भारतीय रेल्वे स्थानकांवरील मोफत वायफाय सेवा रेल्वे मंत्रालयाच्या अधीन असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) रेलटेलमार्फत ‘RailWire’ ब्रँडद्वारे दिली जाते. पूर्वी या प्रकल्पासाठी रेलटेलने गुगल आणि टाटा ट्रस्ट्स यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी केली होती, परंतु आता ही सेवा रेलटेल स्वतः व्यवस्थापित करत आहे.