
मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
मागील लेखामध्ये आपण धारणा या अंतरंगयोगातील पहिल्या पायरीविषयी समजून घेतलं. धारणेनंतर अंतरंगयोगाच्या तीन पायऱ्यांपैकी येणारी दुसरी पायरी म्हणजे ध्यान.
ध्यान हा शब्द आपल्या सगळ्यांना चांगलाच परिचित आहे. ध्यान लागणं, ध्यानात नसणं, बकध्यान हे प्रयोग आपल्या नित्य बोलण्यात आपण वापरत असतो. ध्यान हा शब्द ‘ध्यै’ या क्रियापदावरून घेतला आहे. या क्रियापदाचा अर्थ ध्यान करणं, अखंड चिंतन करणं, मनन करणं, एकाग्रतेनं विचार करणं असा आहे. मात्र पतंजलीच्या योगशास्त्रात ध्यान शब्दाचा विशेष अर्थ आहे. ध्यान शब्दाची व्याख्या पतंजलींनी "तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्" अशी दिली आहे. त्याचा अर्थ धारणा करताना जी भावना चित्तात असेल तीच पुढील अनेक क्षणांत टिकवून ठेवणं म्हणजे त्या भावनेची अर्थात प्रत्ययाची एकतानता म्हणजे ध्यान होय.
या व्याख्याचे सविस्तर आणि सोप्या पद्धतीनं स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे -
धारणेमध्ये चित्ताला एखाद्या स्थानावर बांधून ठेवायचं असतं म्हणजेच स्थिर करायचं असतं. यासाठी एखादी ध्येयवस्तू किंवा इष्टविषय निश्चित केला जातो. मनाला इष्टविषयावर प्रयत्नपूर्वक केंद्रित केलं जातं. अशावेळी मनात उद्भवणाऱ्या इतर विचारांकडे त्रयस्थपणे पाहता पाहता धारणेच्या विषयाचं भान ठेवून धारणा चालू ठेवली जाते. अशाप्रकारे धारणा करत असताना वारंवार मनात उफाळून येणारे नको असलेले अथवा नकारात्मक विचार कमी होऊ लागतात. ध्येय वस्तूवर चित्त केंद्रित होतं. मात्र त्या ध्येयवस्तू संबंधित इतर विचार मनात येतच राहतात. उदाहरणार्थ एखादी देवतेची मूर्ती ही ध्येयवस्तू असेल तर देवतेचं रूप, वस्त्रं, अलंकार, हातातील शस्त्रं इत्यादी देवतेविषयीचे विचार मनात येत राहतात. मात्र आता ध्येयवस्तूव्यतिरिक्त विचार येत नाहीत. म्हणजे धारणेमध्ये अपेक्षित असल्याप्रमाणे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित होतं. केवळ ध्येय वस्तूविषयक विचारच मनात स्थिर होतात. या स्थितीत काही काळ राहिल्यानंतर अशी वेळ येते की चित्त अधिक अंतर्मुख होतं, सूक्ष्म होतं. चित्तातले ध्येयवस्तूविषयक विचारसुद्धा कमी कमी होत केवळ एकच विचार मनामध्ये प्रबळ होऊन राहतो. असा विचार प्रबळ झाला की त्याच्याशी समरसता साधली जाते आणि त्यानंतर ध्येयवस्तू पाहणं, जाणणं ह्या क्रिया नाहीशा होऊन केवळ अनुभव तेवढा राहतो. हा अनुभव ध्येयवस्तूसंबंधित असतो. यालाच प्रत्यय असं म्हणतात.
या अनुभवात सातत्य आलं, तो दीर्घकाळ टिकू लागला म्हणजे ध्यानावस्था प्राप्त होते. ध्यान शब्दाच्या व्याख्येमध्ये एकतानता हा शब्द आहे. याचा अर्थ अखंड, व्यत्यय न येता असा आहे. ध्येयवस्तूचा अनुभव जेव्हा अडथळा न येता, पूर्ण समरसतेनं, अव्याहतयेतो तेव्हा ध्यान सिद्ध होतं. धारणा जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक केली जाते तर धारणा करत असतानाच ध्यान आपोआप लागतं. 'आनंदयोग' या पुस्तकात योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे ध्यानाविषयी म्हणतात, कळीचं फूल कसं झालं हे जसं लक्षात येत नाही तसं धारणेतून ध्यान केव्हा फुललं हे कळत नाही. इंद्रधनुष्याचा एक रंग शेजारच्या रंगात जितक्या बेमालूमपणे मिसळला जातो तशी धारणा ही ध्यानात अगदी नकळत व सहज मिसळली जाते. ध्यान म्हणजे काय याविषयी सहज समजेल असे अगदी योग्य उदाहरण म्हणजे महाभारतातील 'अर्जुन आणि पक्ष्याचा डोळा' ही गोष्ट. ध्यानाच्या अगदी जवळ जाणारी अशी अर्जुनाची एकाग्रता या गोष्टीत दिसून येते.
गुरू द्रोणांनी सर्व विद्यार्थ्यांच्या धनुर्विद्येची परीक्षा घेण्यासाठी एक लाकडी पक्षी झाडावर ठेवला. या पक्ष्याच्या डाव्या डोळ्यातील बुबुळाचा अचूक वेध घेणं असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. विद्यार्थी या परीक्षेसाठी आला की गुरू द्रोण त्याला विचारत की तुला काय दिसत आहे? ‘झाडं, पानं, पक्षी, फळं अशी उत्तर विद्यार्थी देत होते. हाच प्रश्न जेव्हा अर्जुनाला विचारला तेव्हा अर्जुन म्हणाला, 'मला केवळ पक्ष्याच्या डाव्या डोळ्याचं बुबुळ दिसत आहे.'
हे त्याचं उत्तर पराकोटीची एकाग्रता आणि एकाच बिंदूवर स्थिर झालेली अखंड धारणा म्हणजे ध्यान सूचित करतं. कारण पक्ष्याच्या डोळ्याच्या मध्यबिंदू व्यतिरिक्त आजूबाजूची एकही गोष्ट अर्जुनाला दिसत नव्हती आणि अनुभवाला येत नव्हती. ध्यानाच्या व्याख्येत म्हटल्याप्रमाणे त्यानं एकतानता साध्य केली होती. ध्यान ही पतंजलीच्या योगशास्त्रातील चित्ताची एक प्रगत अवस्था आहे. मोक्षाचं साधन म्हणून पतंजलींनी योग सांगितला आहे. आज मोक्ष हे मानवी जीवनाचं ध्येय नसलं तरी आपल्या सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टीनं योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं धारणा आणि ध्यानाविषयी जाणून घ्यावं.