Monday, August 11, 2025

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी  लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

धुक्याने माखलेल्या जंगलात शेकरूंची उधळण


जुन्नर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. श्रावणातला तिसऱ्या सोमवारी यात्रेसाठी लाखो भाविक भीमा शंकराच्या चरणी विलीन होण्यासाठी आले आहेत. यात्रेसाठी देवस्थान व प्रशासनाच्या वतीने दर्शनबारी, मुख दर्शनबारी यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिराची आकर्षक फुलांची सजावट, मंदिराबाहेर मंडपाची व्यवस्था केली. धुक्याने माखलेले भीमाशंकर जंगल भीमाशंकरचे वैशिष्ट्य असलेले शेकरू येथे मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळतात.


भीमाशंकर येथे महाशिवरात्र, श्रावण महिना, चातुर्मास, त्रिपुरारी पौर्णिमा या काळात उत्सव साजरे केले जातात. श्रावणातील यात्रेची प्रशासनाने, देवस्थानने जोरदार तयारी केलेली आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत एसटी महामंडळाने बसची सोय केली आहे. मुखदर्शन बारीमुळे भाविकांना सुविधा उपलब्ध होत आहेत. यात्रेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.



अनादी काळापासून श्रावणात यात्रेचा उत्साह


भीमाशंकर अभयारण्यात हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे. जंगलात गुप्त भीमाशंकर हे ठिकाण असून येथे साक्षीविनायकाचे मंदिर आहे. नागफणी, मुंबई पाॅइंट, भीमाशंकरच्या मंदिराजवळून उगम पावलेली भीमा नदी तेथेच गुप्त झाली व या गुप्त भीमाशंकर ठिकाणाहून पुन्हा पुढे वाहू लागली अशी अख्यायिका असून अनादी काळापासून येथे श्रावण महिना यात्रा उत्साहात साजरी होते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे पवित्र शिवलींगाचे दर्शन पवित्र मानले जाते. पुणे, रायगड व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर १३०.७८ चौरस किलोमीटरमध्ये हे अभयारण्य कड्यांमूळे दोन भागात पसरलेले आहे. १९८५ साली भीमाशंकरचे हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे. हा अतिवृष्टी पावसाळी प्रदेश, थंड हवेचे ठिकाण व नजरेच्या टप्प्यात सभोवतालचा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.



हेमाडपंथी शैलीचे मंदिर


सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे पवित्र स्वयंभू ज्योर्तिर्लिंग हे प्राचीन काळापासून हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहे. येथे शिवपार्वती हे अर्ध्या भागात वसल्याने नटेनारेश्वर असेही म्हटले जाते. येथे भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामापासून झाली आहे. त्यामुळे भीमेचे उगमस्थानच येथे आहे. पवित्र शिवलींगाचे दर्शन घेऊन पायऱ्यांनी वर आल्यावर कळमजाई मातेचे मंदिर आहे. तेथील दर्शन घेतल्यानंतरच पूर्ण दर्शन होते अशी अख्यायिका आहे. अनादी काळापासून येथे महाशिरात्री व श्रावण महिना यात्रा उत्साहात साजरी होते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे पवित्र शिवलींगाचे दर्शन पवित्र मानले जात. अनेक हौशी पर्यटक कर्जत खांडस मार्गे गणेश घाट, शिडी घाटा मार्गे पायी मोठ्या प्रमाणावर भीमाशंकरला येतात.



जंगल परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू


भीमाशंकर सह्याद्री पर्वत रांगांतील एक उत्तुंग शिखरावर वसलेले घनदाट अभयारण्य. जंगलातच बारा ज्योर्तिलींगापैकी एक सहावे भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे आहे व या जंगलातूनच एक प्रमुख भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर मंदिर व जंगल परीसरात अनेक ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे आहेत. यामध्ये मंदिराबाहेर असलेली पोर्तुगीज काळातील घंटा, घंटेला लागून असलेले शनि मंदिर, मंदिराजवळचे गोरक्षनाथ मंदिर, पायऱ्यांच्या सुरुवातीला असलेले कमलजादेवी मंदिर ही प्राचीन मंदिरे आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >