
कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप
मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले मराठी अभिनेते किशोर कदम (Kishor Kadam) यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांचे अंधेरी चकाला येथील घर धोक्यात आल्याची चर्चा आहे. यासंदर्भात किशोर कदम यांनी संबंधित बिल्डर आणि अधिकाऱ्यांची तक्रार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत, मदतीची मागणी केली आहे.
किशोर कदम यांनी अंधेरी पूर्व येथील चाकाला परिसरातील हवा महाल सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली पीएमसी (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी) आणि बिल्डर यांनी संगनमताने सोसायटीच्या २३ सभासदांची घरे धोक्यात आणली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह सर्वसामान्य जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.
त्यांनी सोशल मिडियावर या संदर्भात एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यात त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
बहुसंख्य सभासदांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने हा घोटाळा घडवल्याचा आरोप सौमित्र यांनी या पत्राद्वारे केला आहे. सरकारच्या बहुसंख्येच्या कायद्यामुळे चौकस सभासदांचा आवाज दडपला जात असून, सामान्य माणसाला वर्षानुवर्षे बिल्डर आणि पीएमसीच्या आर्थिक ताकदीविरुद्ध लढावे लागत आहे. अशा अनेक प्रलंबित केसेस मुंबईत असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे. हे सामान्य माणसाच्या अधिकाऱ्याचे उल्लंघन असल्याचे मत मांडताना, किशोर कदम यांनी या गंभीर समस्येकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी आपले घर आणि इतर सभासदांचे हक्क वाचवण्यासाठी सर्व रसिक जनतेला आणि नेत्यांना पाठिंब्याचे आवाहन केले आहे.