Monday, August 11, 2025

Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

Dadar Kabutar Khana :

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutar Khana) प्रकरणावरून सध्या चांगलाच वाद पाहायला मिळत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तेथे प्रवेश बंद केला होता. मात्र, ६ ऑगस्ट रोजी जैन धर्मीयांनी अचानक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान जमलेला जैन समुदाय (Jain Community) अत्यंत आक्रमक झाला होता. कबुतरखान्याभोवती टाकलेली ताडपत्री त्यांनी फाडून टाकली, तसेच पालिकेने ताडपत्री बसवण्यासाठी लावलेले बांबूही मोडले. एवढेच नाही तर जैन समाजातील काही महिला चाकू घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी सुतळी व दोऱ्या कापण्याचे काम केले. या घटनेनंतर रविवारी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सार्वजनिकरित्या जहाल विधान करत, “आमच्या धर्मापुढे आम्ही न्यायालयालाही मानत नाही,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या भाषणाने संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर जैन समाजातील काही व्यक्तींनी दाखवलेल्या अरेरावीला उत्तर देण्यासाठी मराठी एकीकरण समितीने मैदानात उतरायचे ठरवले आहे. यामुळे दादर परिसरात या वादाचा पुढील काही दिवसांत अधिक तीव्र परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




दादर कबुतरखान्याच्या प्रकरणात आता मराठी एकीकरण समितीने जैन समुदायाच्या आंदोलनाला थेट प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. समितीचे म्हणणे आहे की, कायद्याचा अवमान करणारे, पोलिसांशी धक्काबुक्की करणारे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. त्याचबरोबर, कबुतरखाना हा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. या मागण्यांसाठी आणि आंदोलनकर्त्यांच्या अरेरावीविरोधात मराठी एकीकरण समितीने बुधवारी दादरमध्ये मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या आंदोलनाला पोलीस परवानगी देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, परवानगी मिळाल्यास परिस्थिती अधिक तापण्याची शक्यता आहे. याशिवाय, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि ठाकरे गटासारखे काही राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देऊन आपली ताकद दाखवू शकतात. त्यामुळे दादर परिसरात बुधवारी काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




कबुतरखाना पुन्हा झाकून बंद


दादर कबुतरखान्याच्या वादावर नव्या घडामोडी घडल्या असून, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सरकार आणि न्यायालयाला थेट आव्हान दिल्यानंतर काही तासांतच मुंबई महानगरपालिकेने तातडीने कारवाई केली. पालिकेने कबुतरखाना पुन्हा एकदा ताडपत्रीने झाकून बंद केला आहे. यावेळी गेल्यावेळीपेक्षा अधिक काटेकोरपणे चारही बाजूंनी ताडपत्री लावण्यात आली असून, एकही कबुतर आत शिरणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. कबुतरखान्याच्या चारही बाजूंना गोलाकार बॅरिकेटिंग उभारण्यात आले आहे. परिसरात दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, ज्यामुळे ६ ऑगस्टप्रमाणे पुन्हा आंदोलन करणे जैन समाजाला शक्य होणार नाही. यापूर्वी जैन धर्मीयांनी ताडपत्री हटविण्याचा प्रयत्न केला होता, ज्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणातील पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार आहे, आणि तोपर्यंत कबुतरखाना बंद राहणार की सुरू होणार, याबाबतची उत्सुकता कायम आहे.

Comments
Add Comment