Monday, August 11, 2025

दहीहंडीच्या सरावादरम्यान बालगोविंदाचा करूण मृत्यू, दहिसरमध्ये शोककळा

दहीहंडीच्या सरावादरम्यान बालगोविंदाचा करूण मृत्यू, दहिसरमध्ये शोककळा

११ वर्षाचा गोविंदा महेश जाधवचा थरावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू


दहिसर:  दहीहंडीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मुंबई उपनगरातील दहिसर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीपाडा परिसरात नवतरुण गोविंदा पथकाचा बालगोविंदा महेश रमेश जाधव (वय ११) याचा सरावादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.


रविवारी रात्री अकरा वाजता दहिसरच्या केतकीपाडा परिसरात नवतरुण मंडळाकडून दहीहंडीचे थर रचण्याचा सराव सुरु होता. यावेळी या मंडळाचा बालगोविंदा महेश जाधव हा वरच्या थरावर चढला होता. या दरम्यान त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट खाली पडला. ज्यामुळे त्याला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळतात दहिसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन महेश जाधव याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, यामध्ये कोणाची चूक होती, त्याचा पाय सटकला की नेमके काय झाले, याचा तपास सध्या दहिसर पोलिसांकडून सुरु आहे.


मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या उत्सवात मुंबईतील हजारो गोविंद पथकं सहभागी होत असतात.  यावर्षी हा उत्सव १६ ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या दिवसासाठी काही दिवस आधी अनेक गोविंदा पथकांकडून दहीहंडीचा सराव केला जातो. मात्र, या दरम्यान गोविंदाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. कारण छोटीशी दिरंगाई आणि नजरचूक जिवावर बेतू शकते.  दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. त्यामुळे यंदा असे प्रकार घडू नये आणि सणाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई प्रशासन सज्ज झाले आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारने गोविंदा पथकांसाठी विमा योजनेची घोषणा केली आहे. सर्व गोविंदा पथकांना या विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.

Comments
Add Comment