Sunday, August 10, 2025

‘वो भारत देश है मेरा...’

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला. कलाकार पृथ्वीराज कपूर, दारासिंग, मुमताज, प्रेम चोपडा, वीणा, राजन हक्सर, विजयलक्ष्मी, बुरहानुद्दीन, सौदागरसिंग, हेलन, गंगा आणि प्रेमनाथ. निर्माते गुलशन बहल तर संगीतकार होते हंसराज बहल. लेखक होते कमर जलालाबादी.
इ. स. ख्रिस्तपूर्व ३२६ मध्ये सिकंदर पर्शिया आणि अफगाणिस्तान जिंकल्यावर झेलमच्या किनाऱ्यावर येतो. महाराजा पौरसांचे सैन्य त्याला सीमेवरच अडवते. आपले गुरू अॅरीस्टॉटल यांचा सल्ला विसरून तो रुक्साना नावाच्या एका पर्शियन मुलीच्या (हेलन) प्रेमात पडलेला असतो. महाराजा पौरसांचे सामर्थ्य माहीत असलेली रुक्साना त्यांच्याकडून सिकंदराला ठार न करण्याचे वचन घेते.


महाराजांचा सुपुत्रच युद्धात कामी येतो आणि ते शत्रूच्या तावडीत सापडतात. सिकंदराबरोबर झालेल्या संभाषणात महाराजांचे धाडस आणि आत्मविश्वास बघून तो प्रभावित होतो आणि त्यांचे राज्य परत करून निघून जातो. दोन्ही राज्यात मैत्री होते. असे सर्वसाधारण कथानक.


गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी त्यावेळच्या वैभवशाली भारताचे सुंदर चित्र एका गाण्यातून उभे केले होते. त्याकाळी ‘भारत म्हणजे एक ‘सोनेकी चिडिया’ आहे’ असे म्हटले जाई. सिनेमात जेव्हा हे गाणे येते तेव्हा दिग्दर्शकांनी देशाचे जुने वैभव दाखविणारी सुंदर दृश्ये दाखवली होती.


एका विशाल मिरवणुकीत राजे पौरस सजलेल्या हत्तीवर स्वार होऊन, मोठ्या लव्याजम्यासह मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत जात आहेत असे ते दृश्य होते. या पार्श्वभूमीवर देशाच्या तत्कालीन वैभवाचे एकेक पदर उलगडून दाखवणारे, रफीसाहेबांनी त्यांच्या रेशमी स्वरात गायलेले, हे गीत वाजते. हंसराज बहल यांनी शुद्ध कल्याण रागात बसवलेल्या त्या गीताचे शब्द होते -


जहाँ डाल डालपर सोनेकी
चिड़िया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा,
वो भारत देश है मेरा।’


भारताकडे सगळ्या जगाला आकर्षित करणारे प्रचंड वैभव होते तरीही भारत सर्वांपेक्षा वेगळा होता. भारताची श्रीमंती ही बॉबीलॉन संस्कृतीसारखी किंवा मुगल साम्राज्यासारखी इतरांच्या लुटालुटीवर, निर्घृण हिंसेवर आधारलेली नव्हती हे कवी मोठ्या खुबीने सूचित करतात. ते म्हणतात, इथे ‘सत्य अहिंसा आणि धर्मावर आधारित’ राजसत्ता होती. नेहमी काय सत्य आहे, काय योग्य, काय अयोग्य यावर चर्चा होत असे. युद्धातही काय धर्म आणि काय अधर्म आहे याचा विचार व्हायचा.
‘जहाँ सत्य अहिंसा और धरमका पगपग लगता डेरा,


वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा... जय भारती, जय भारती...’
भारतीय संकृती ऐहिक सुखाच्यामागे धावणारी नव्हती. तिला कायमच अध्यात्माचे पवित्र अधिष्ठान होते हे सूचित करताना गीतकार म्हणतात, कोणताही ऐहिक स्वार्थ शिल्लक नसलेले आमचे ऋषीमुनी जंगलात जावून मानवकल्याणासाठी तप:श्चर्या करत, ध्यानधारणा करत. इथली नाती एखाद्या तात्पुरत्या कंत्राटासारखी क्षणजीवी नसत. पतीपत्नीमधले प्रेम राधेच्या निरपेक्ष समर्पणाची आठवण करून देणारे, जन्मजन्मांतरीचे नाते जपणारे असायचे. युवक भगवान श्रीकृष्णासारखे राज्यशास्त्रापासून, धनुर्विद्येपासून थेट अध्यात्मिक ज्ञानापर्यंत सर्व गोष्टीत पारंगत असत. इथेच सर्वात आधी ज्ञानाचा सूर्य उगवायचा -


‘यह धरती वो जहाँ ऋषिमुनि जपते प्रभूनामकी माला,
हरीओम, हरीओम, हरीओम, हरी ओम.
जहाँ हर बालक इक मोहन है, और राधा इकइक बाला,
जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा.’


राजेंद्रकृष्णजी देशाचा उदात्त वैचारिक वारसा सांगून थांबत नाहीत. ते देशाच्या भूगोलाच्या आणि नैसर्गिक समृद्धीचाही आढावा घेतात. ते म्हणतात, ‘जिथे गंगा, यमुना, कावेरीसारख्या नद्या देशाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा सर्व भूभागांना वत्सल मातेप्रमाणे आपले अमृत पाजतात, माझ्या देशाची भूमी सुजल, सफल आहे, वेगवेगळ्या उपयुक्त आणि औषधी वनस्पतींनी ती समृद्ध आहे.


‘जहाँ गंगा, जमुना, कृष्णा
और कावेरी बहती जाये,
जहां उत्तर, दक्षण, पूरब, पश्चिमको अमृत पिलवाये, ये अमृत पिलवाये.
कहीं यह फल और फूल उगाये, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा...’


जेव्हा हे कडवे येते तेव्हा आपण जणू विमानातून किंवा गुगल मॅपवरून सगळा भारत पाहातोय असे वाटू लागते आणि “केसर कही बिखेरा” हे शब्द येतात तेव्हा काश्मीरच्या डोंगराळ भागात थंड हवेच्या झुळुकांवर डोलणारी केशराची जांभळी शेते डोळ्यांसमोर येतात.


कवीची लेखणी मग वळते देशाच्या सांस्कृतिक वैभवाकडे. उत्सवप्रिय भारतीय समाजमनाने रूढ केलेले सणवारही कसे आगळे आहेत ते सांगताना राजेंद्रजी दिवाळीत घराघरांत लावल्या जाणाऱ्या, मंदपणे तेवत राहणाऱ्या, दिव्यांचा उल्लेख करून लगेच आपल्याला होळीच्या धामधुमीची आठवणही करून देतात. जिथे मानवी भावनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या रागदारीवरील गायनाचे, रंगांचे उत्सव होतात, हास्यविनोदात रमणारी मने वसतात तो माझा भारत आहे!


‘अलबेलोंकी इस धरतीके त्यौहार भी हैं अलबेले,
कहीं दिवालीकी जगमग है, होलीके कहीं मेले,
जहाँ राग रंग और हसीख़ुशिका चारो और है घेरा,
वो भारत देश है मेरा...’


कवी देशाचे सर्व भाग कवेत घेतो. दक्षिणेतील असंख्य मूर्तींचे बारीक नक्षीकाम असलेली भव्य मंदिरे त्याला आकृष्ट करतात. परस्पर विश्वासावर आधारलेल्या भारतीय संस्कृतीचे वर्णन करताना तो म्हणतो, ‘इथे आकाशाशी संवाद साधणारी उंचच उंच मंदिरे आहेत, कोणत्याही घरांना कुलुपे लावायची गरज पडत नाही इतकी ईश्वरनिष्ठा आणि प्रामाणिकपणा मनामनात रुजलेला आहे. इथली सकाळ भक्तीभावना जागवणाऱ्या कन्हैयाच्या बासरीतून मंगलसुरांनी येते आणि तिची सांगता संधीकालच्या पवित्र स्तोत्रपठणाने होते -


‘जहां आसमानसे बाते करते मंदिर और शिवाले,
किसी नगर में किसी द्वारपर कोई ना ताला डाले,
और प्रेमकी बंसी जहाँ बजाता आए श्याम-सवेरा.
वो भारत देश हैं मेरा...’


आज अमानुष विचारांच्या शत्रूंनी देशाला चहूबाजूंनी वेढलेले असताना, युवावर्गात देशभक्ती जागवण्याची तातडीची गरज असताना, राजेंद्रजींसारखे कवी कुठे सापडतील हा मोठा प्रश्न आहे! निदा फाजली म्हणाले होते, तशी कविता आणि एकंदर मनोरंजनविश्वच केवळ ‘तू, मी, आणि शारीरिक आकर्षणावर आधारलेले क्षणिक प्रेम’ यावरच केंद्रित होताना दिसते आहे.


सर्व प्रकारच्या बेछूट वर्तनाला उत्तेजन देणारे आजचे मनोरंजनविश्व देशाला आतून पोखरत असताना अशी नितांत सुंदर गाणी मनाला थोडाफार दिलासा नक्कीच देतात. म्हणूनच तर हा नॉस्टॅल्जिया.

Comments
Add Comment