
मुंबई: निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी शरद पवारांसोबतची ती दोन माणसे कोण आहेत, त्यांची नावे राहुल गांधी यांनी जाहीर करावीत, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी दोन मंडळी आपल्याला भेटल्या होत्या. त्यांना राहुल गांधी यांच्या समोर नेले. परंतु, राहुल गांधी यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा दावा ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी शनिवारी नागपूर येथे केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, 'किती खोटं बोलावे याला मर्यादा असते. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याकडे कोण येतो कोण जाते याची नोंद असायला हवी. शरद पवार ज्या दोघांना घेऊन गेले, याची नोंद राहुल गांधीच्या घरी नक्कीच असणार. त्यामुळे शरद पवारांसोबत दोन माणसं कोण होती? त्यांची नावे जाहीर करावीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘मंडल यात्रे’वर केली टीका
प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘मंडल यात्रे’वर देखील सडकून टीका केली आहे. या यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण करणे नाही, तर यामागे राजकीय हेतू आहे,” असा आरोप आंबेडकर यांनी केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहे,” असे ते म्हणाले.