Sunday, August 10, 2025

साधू आणि सरपंच

साधू आणि सरपंच

कथा : रमेश तांबे


एका गावात एक साधू राहायचा. गावातल्या एका देवळात तो विशिष्ट वेळी बसलेला असायचा. तेजःपूंज चेहरा, पांढरी शुभ्र लांबलचक दाढी, मानेपर्यंत रुळणारे केस, पाणीदार डोळे, बघताक्षणी त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसावा असे व्यक्तिमत्त्व आणि ओघवती गोड वाणी! त्यामुळे गावातली अनेक मंडळी त्याच्याकडे जायची. महाराजांना आपली सुखदुःख सांगायची. मग साधू महाराजदेखील डोक्यावर हात ठेवून, हवेतून अंगारा-धुपारा काढून, कधी पाठीवर हात फिरवून, लिंबातून लाल पाणी काढून आपल्या भक्तांना प्रभावित करत. लोक खूश होऊन महाराज सांगतील तेवढे पैसे त्यांच्या थाळीत टाकत. मग महाराजदेखील हळूच थाळीतल्या नोटा खिशात कोंबत. असा अनेक वर्षे महाराजांचा सत्संग सुरू होता.


अशा या आपल्या स्वतःच्या गावात विशाल आपल्या मित्रांसह भटकंती करण्यासाठी आला होता. दोन-चार मोठे वाडे आणि दोन नव्या कोऱ्या इमारती सोडल्या तर सारे गाव तसे साधेच वाटत होते. मातीच्या भिंती असलेली छोटी-छोटी कौलारू घरे होती. साऱ्या गावात एक प्रकारची गरिबी दिसत होती. विशालला या गोष्टीचे खूप नवल वाटले. एवढी सुपीक जमीन, बारा महिने वाहणारी नदी असे असताना गावात गरिबी का? विशालची चौकस बुद्धी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.


तो मित्रांसह तसाच माघारी फिरला. मग थेट सरपंचांच्या घरी गेला अन् म्हणाला, “सरपंच काका गावात एवढी गरिबी का? एवढं पाणी आहे नदीला. लोक शेती करत नाहीत का? कष्ट करीत नाहीत का?” विशालच्या या प्रश्नाने सरपंच चपापले. पण सावध होऊन सांगू लागले, “अरे विशाल आपल्या गावावर कोणीतरी करणी केली आहे. त्यामुळे गावावर सतत संकटे येतात. काम करूनही लोकांना फायदा होत नाही आणि आजारपण तर चालूच असते. त्या देवळातल्या साधू महाराजांमुळे गाव तरले आहे. त्यांची मोठी कृपा आपल्या गावावर आहे.” सरपंचाच्या बोलण्यावर विशाल आणि मित्रांचा विश्वास बसेना. पण त्यांनी सारे ऐकून घेतले.


संध्याकाळी विशाल एकटाच बाहेर पडला. मंदिरात आरती सुरू होती. विशाल तिकडे गेला. बघतो तर काय तीनशे-चारशे लोक आरतीसाठी उभे होते. टाळ्या वाजवत होते. नाचत होते. समोर साधू महाराजही तल्लीन झाले होते. अर्ध्या तासाने आरती संपली. लोकांनी धडाधड आरतीच्या ताटात पैसे टाकले. कोणी शंभर तर कोणी पाचशे. महाराजांचा आशीर्वाद घेऊन लोक घरी परतले. साधू महाराज सगळे पैसे गोळा करत होते. तेवढ्यात तिथे सरपंच हजर झाले. महाराजांनी गोळा झालेले सर्व पैसे सरपंचांकडे दिले. आता मात्र विशालची खात्री पटली. साधू महाराज आणि सरपंच या भोळ्या गावकऱ्यांना देवाच्या कोपाची, भुताखेताची भीती दाखवून लुबाडत आहेत. गाव अंधश्रद्धेमध्ये विचारशक्ती गमावून बसले आहेत. पण आता लोकांचा भांडाफोड करायचाच. या विचाराने तो आणि त्याचे मित्र काम करू लागले. तालुक्याच्या पोलिसांनाही त्याने सामील केले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना ही संधी मिळाली.


झोपायला जातो असे सांगून विशाल आणि विनायक रात्री १०-११च्या सुमारास घराबाहेर पडले. तेवढ्यात कुणी तरी पळत जाताना त्यांना दिसले. त्याच्या हातात कसली तरी बोचकी दिसत होती. विशालने नीट पाहिले तर सरपंच आणि साधू महाराज...! पुढे धावत जाऊन ते एका गाडीत बसले. विशाल लगेचच फोनवरून कुणाशी तरी दबक्या आवाजात बोलला. मग दोघेही पटकन घरात गेले अन् झोपी गेले.


दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता विशाल आणि मंडळी जागी झाली. तेव्हा पोलिसांचा सरपंचाच्या घराला गराडा पडला होता. विशाल आणि त्याचे मित्र डोळे चोळत झोपेतून उठले. सरपंचांची आई जोरजोरात रडत होती. ओरडत होती. “कुणा मेल्यानं पोलिसांत तक्रार केली. तरी मी त्याला किती वेळा सांगितलं, त्या साधूच्या नादी लागू नको. पण ऐकले नाही माझे.” यावेळी विशालच्या चेहऱ्यावर चिंतेचा पत्ताच नव्हता. उलट ढोंगी साधू आणि लबाड सरपंचापासून गावातल्या भोळ्याभाबड्या लोकांना वाचवण्याचे समाधान मात्र खूप होते.

Comments
Add Comment