
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० ऑगस्ट रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता बेंगळूरु इथल्या केएसआर रेल्वे स्थानकावर ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते बेंगळूरु मेट्रोच्या यलो लाईनला हिरवा झेंडा दाखवतील, यासोबतच ते आर.व्ही. रोड (रागीगुड्डा) ते इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करणार आहेत.
आपल्या कर्नाटक भेटीत पंतप्रधान दुपारी 1 वाजता बेंगळूरुमधील शहरी दळणवळणीय जोडणीशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यासोबत ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते बेंगळूरु मेट्रो फेज-2 प्रकल्पाच्या आर.व्ही. रोड (रागीगुड्डा) ते बोम्मसंद्रा या यलो लाईनचे उद्घाटनही होणर आहे. या मार्गिकेची लांबी 19 किमी पेक्षा जास्त असून, या मार्गिकेवर 16 स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 7,160 कोटी रुपये खर्च केला गेला आहे. यलो लाईन सुरू झाल्याने बेंगळूरुमधील मेट्रो जाळ्याचा विस्तार 96 किमीपेक्षा जास्त होणार असून, त्याचा या भागातील मोठ्या लोकसंख्येला फायदा होणार आहे.
आपल्या कर्नाटक भेटीत पंतप्रधान बेंगळूरु मेट्रो फेज-3 प्रकल्पाची पायाभरणीही करणार आहेत. या प्रकल्पासाठी 15,610 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पाची एकूण लांबी 44 किमी पेक्षा जास्त असणार असून, या प्रकल्पाअंतर्गत 31 उन्नत स्थानके असणार आहेत. या पायाभूत प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यात मदत होईल, तसेच निवासी, औद्योगिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्र परस्परांशी जोडली जातील.
पंतप्रधान बेंगळूरु इथून 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवणार आहेत. याअंतर्गत बेंगळूरु ते बेळगावी, अमृतसर ते श्री माता वैष्णो देवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या गाड्यांचा समावेश आहे. या अति उच्च वेगाच्या रेल्वे गाड्यांमुळे प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा लक्षणीय विस्तार होईल, प्रवासाच्या वेळेची बचत होईल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभवही मिळू शकणार आहे.