
प्रा. अशोक ढगे
एक अविकसित, अप्रगत देश म्हणून चिडवले जाण्यापासून आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणारा देश हे बिरुद मिळवेपर्यंतचा आपला प्रवास सोपा अजिबातच नव्हता. अनेक सामाजिक, आर्थिक, वैचारिक स्थित्यंतरांमधून वाटचाल करत आपण अवकाशापासून सागरापर्यंत प्रत्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यवेध घेणे समयोचित ठरावे.
तिसऱ्या जगातील म्हणजेच आशिया, आफ्रिका खंडातील साधारण १२०-१२५ देशांमध्ये इतक्या दीर्घकाळ लोकशाही टिकलेले भारताखेरीज दुसरे उदाहरण दिसत नाही. लोकशाहीचे यश हा अपवाद असतो, असे साधारणपणे म्हटले जाते, कारण तिसऱ्या जगामध्ये लोकशाहीचे अपयशच अधिक पाहायला मिळते. या अर्थाने भारताने आपले स्वातंत्र्य जपणे ही फार मोठी कमाई म्हणायला हवी. ७८ वर्षे लोकशाही टिकवणे ही बाब एक उपलब्धी मानावी लागेल.
आत्तापर्यंतच्या प्रवासात देशापुढे अनेक अडथळे आले. पण आपण त्यावर विजयही मिळवला. भारताचे तत्कालिन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी आपल्या लोकशाहीला ‘तीन सी’ची लागण असल्याचे उद्गार काढले होते. हे तीन सी म्हणजे क्रिमिनॅलिटी, कॅश आणि करप्शन. या तत्त्वांचा प्रभाव काढून टाकला तरच आपली लोकशाही निरोगी पद्धतीने काम करेल असे त्यांचे म्हणणे होते. काहीजणांनी असे चांगले चित्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नही केले; परंतु दुर्दैवाने त्याला यश मिळाले नाही.
१९४७ च्या तोंडावर फाळणीच्या भळभळत्या जखमा आपल्याबरोबर होत्या. पाकिस्तानला बरेच सैन्य, पैसे द्यावे लागले. भारताला स्वतःची राज्यघटनाही नव्हती. देश संस्थानिकांचा होता. त्यात एक कायदा नव्हता.
सामाजिकदृष्ट्या आपण फार मागे होतो. त्यामुळे पहिली अडीच वर्षं तर देश ब्रिटिशांनी घालून दिलेल्या कायद्यानुसार चालत होता. दोन वर्षांहून अधिक काळ राज्यघटनेची कलमे, मसुदा ठरवण्यात गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात आदर्श ठरावी अशी राज्यघटना तयार केली. देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी काँग्रेस सत्तेत येणे स्वाभाविक होते. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचे सरकार आले. अर्थातच सरकारसमोर अनेक आव्हाने होती. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नेहरूंनी त्याचा उल्लेख केला होता. अमेरिका आणि रशियाधार्जिणी राष्ट्रे अशी जगाची विभागणी झाली होती.
आपण मात्र दोन्ही सत्तांपासून सारख्या अंतरावर म्हणजे तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले. अलिप्त राष्ट्रांचा एक गट तयार झाला. देशाने भांडवलशाही आणि साम्यवादी अशा दोन्ही अर्थव्यवस्थांना दूर ठेवले. संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यानंतर पंचवार्षिक नियोजन सुरू झाले. पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीवर भर देण्यात आला. मोठमोठी धरणे बांधली गेली. शेतीच्या संरचनावर भर देण्यात आला, तरीही देशातल्या लोकसंख्येला पुरेल इतके धान्य उत्पादन होत नव्हते. लालबहाद्दूर शास्त्रींनी हेच धोरण सुरू ठेवले. आज रशियाशी मैत्री असली, तरी आपण अमेरिकेच्याही जवळ गेलो आहोत.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताने अणुभट्ट्यांपासून उपग्रहनिर्मितीपर्यंत नानाविध आव्हाने पेलण्याची सारी प्रक्रिया सुरू केली. पुढील काळात भारताने बांगलादेशची निर्मिती करून जगाच्या नकाशावर एक राष्ट्र तयार केले. भारताने जगाला कळू न देता अणुस्फोट केला. देशाला खलिस्तानवादी चळवळीशी सामना करावा लागला. अमृतसरच्या सुवर्णमंदिरात लष्कर घुसवल्याची किंमत देशाला इंदिराजींच्या बलिदानाने मोजावी लागली. त्याअगोदर एक महत्त्वाची क्रांती देशात झाली. डॉ. एम. एस. स्वामिनाथन आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या कल्पनेतून देशात हरित क्रांती आकाराला आली.
अन्नधान्याची आयात करणारा देश अन्नधान्याची निर्यात करणारा बनला. एव्हाना आपल्याकडून खुल्या आणि पारदर्शी व्यवस्थेचा पुरस्कार केला जात आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा निष्पक्षपाती मागोवा घेतला तर आपल्याला स्वच्छ आणि सुंदर प्रशासन दृढ होताना दिसते. गूड गव्हर्नन्स आणि कमीत कमी हस्तक्षेपापर्यंतचा प्रवास सहजसाध्य नव्हता. भारताने आधुनिकतेची आणि तंत्रज्ञानाची वाट चोखाळली.
देश आत्मविश्वासाने समृद्धीच्या वाटा चालत गेला. अमेरिकेने संगणक द्यायला नकार दिला तर तो भारतातच तयार झाला. क्षेपणास्त्र प्रक्षेपणात तर भारताने जगात अनेक विक्रम केले. एकाच वेळी शंभरपेक्षा अधिक उपग्रह अवकाशात पाठवले. सुरुवातीला इतर देशांच्या क्षेपणास्त्र केंद्रातून आपण उपग्रह पाठवत होतो. आता आपण प्रगत देशांचे उपग्रह अंतराळात पाठवतो. चंद्रावर स्वारी करण्याची आपली तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाभिमानाला महत्त्वाकांक्षेची जोड दिली. देशाच्या लष्कराला शत्रुराष्ट्रे किंवा अतिरेक्यांवर कारवाईचा मुक्तहस्त दिला. त्याअगोदर अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या कवीमनाच्या पंतप्रधानांनी अणुस्फोट घडवले, कारगीलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. देशाने त्याअगोदरही दोन वेळा पाकिस्तानचा पराभव केलेला पाहिला.
अलीकडेच त्यांना पुन्हा एकवार धडा शिकवून भारताने खंबीर भूमिका समोर मांडली आहेच. जगानेही ही ताकद पाहिली. मागील दशकांमध्ये देशात मध्यमवर्गीयांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हाच वर्ग सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अवकाशक्षेत्रातील डॉ. साराभाईंची कामगिरी, आण्विक विज्ञानातली डॉ. होमी भाभांची कामगिरी, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे योगदान प्रकाशझोत टाकणारे ठरले. सरकारने व्यापार, उद्योगात पडावे की नाही, हा वादाचा मुद्दा आहे; परंतु स्वातंत्र्य मिळाले तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. देशात उद्योजक कमी होते. सरकारला रोजगारनिर्मिती करणे आवश्यक होते. त्यामुळे पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांमध्ये देशाने उद्योगधंदे उभारले. सरकारने त्यात मोठी गुंतवणूक केली.
१९९१ मध्ये देशाची आर्थिक स्थिती अतिशय वाईट झाली होती. इंधन खरेदीसाठीही पैसे नव्हते. त्यावेळी आपण खुले आर्थिक धोरण अवलंबले. त्याची फळे आता चाखायला मिळत आहेत. एका आठवड्याचे इंधन खरेदी करण्यासाठीही हाती परकीय चलन नसणाऱ्या देशाकडे सध्या सहाशे अब्ज डॉलरचा परकीय चलनाचा साठा आहे. भारताची लोकसंख्या ही सध्या देशाची जमेची बाजू झाली आहे. जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत. आज भारताला एक जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. म्हणूनच एकविसावे शतक भारताचे आहे. भारतात कमावणारे हात वाढत आहेत, ही चांगली बाब आहे. जगभरात कितीही पडझड झाली आणि हुकूमशाही नांदली, तरी भारताच्या लोकशाहीला धक्का लागलेला नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने लष्कराचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला आहे. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, महिला आणि बालविकास, शेतीतल्या पायाभूत सुविधांसाठी पुरेशी तरतूद करण्याचे आव्हान आता आपल्यासमोर आहे. एकीकडे युवक ही देशाची संपत्ती आहे, असे सांगितले जात असताना बेरोजगारी मात्र वाढत आहे. दरवर्षी कोट्यवधी युवकांना रोजगार देण्याची आश्वासने दिली गेली; परंतु ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणायला हवीत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तेव्हा ‘इंडियाज ट्रायस्ट विथ डेस्टिनी’ या शीर्षकाचे भाषण नेहरूंनी केले होते.
भारताने नियतीशी केलेला करार म्हणजे स्वातंत्र्य, असे स्वातंत्र्यानंतर म्हटले होते. गेल्या काही वर्षांमध्ये हा करार पाळला गेला का, त्यातून काय साधले या प्रश्नाचे उत्तर नागरिकांनी मिळवायला हवे आणि सकारात्मक पावले उचलत भविष्याकडे वाटचाल करायला हवी. हे आव्हान फार मोठे नसले तरी जबाबदारी मोठी आहे. ती आता पेलायला हवी.